सायबर विभागाकडून अज्ञात मोबाईलधारकाविरोधात गुन्हा दाखल

पणजी : शेअर ट्रेडिंगमध्ये जास्त मोबदला देण्याचे आमिष दाखवून बार्देश तालुक्यातील एक ज्येष्ठ नागरिकाला १२.०४ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला होता. या प्रकरणी सायबर विभागाने अज्ञात मोबाईलधारकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सायबर गुन्हा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी बार्देश तालुक्यातील ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, तक्रारदाराला जैनम शेअर ब्रोकिंगची एक ऑनलाईन जाहिरात मिळाली. ती खरी असल्याचे गृहीत धरून त्यांनी त्यावर संपर्क केला. त्यानंतर ९६०१६७२५९२ या मोबाईलधारकाने त्याच्याशी वॉट्सअॅपच्या माध्यमातून संपर्क साधला. त्यानंतर तक्रारदाराला ‘जैनम स्टॉक ब्रोकिंग’ हा शेअर ट्रेडिंग अॅप डाऊनलोड करण्यास लावले. त्या अॅपद्वारे तक्रारदाराला विविध बँकेच्या खात्यात सुमारे १२ लाख ४ हजार ८०० रुपये जमा करण्यास भाग पाडले. तक्रारदाराने जमा झालेली रक्कम काढण्यासाठी संबंधित मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता त्याला शुल्क म्हणून आणखी रक्कम जमा करण्यास सांगितले. त्यावेळी त्याला संशय आल्यामुळे त्याने वरील अॅपची चौकशी केली असता, ते बनावट असल्याचे समोर आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने सायबर विभागात तक्रार दाखल केली.
याची दखल घेऊन निरीक्षक अनुष्का पैबीर यांनी अज्ञात वॉट्सअॅप मोबाईल धारकाविरोधात भा. न्या. संं.च्या ३१८(४), ३१९(२) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(डी) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.