गोवा कॅथलिक संघटनेची डीजीपींकडे तक्रार

पणजी : कोलवा चर्चमध्ये पोलिसांची फौज घेऊन जाऊन फादरना दोन तास कोंडून ठेवणे, हे कायद्याचे उल्लंघन आहे. पोलीस महासंचालकांनी याची दखल घेऊन पोलीस निरीक्षक विक्रम नायक यांना निलंबित करावे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी गोवा कॅथलिक संघटनेचे (कॅग) अध्यक्ष सिरील फर्नांडिस यांनी केली आहे.
कोलवा चर्चमध्ये घडलेल्या घटने संदर्भात ‘कॅग’ने तत्कालीन पोलीस निरीक्षक विक्रम नायक यांच्या विरोधात पोलीस महासंचालकांकडे तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी कॅगचे दक्षिण गोवा उपाध्यक्ष मेल्विन फर्नांडिस उपस्थित होते.
विक्रम नायक यांनी केलेल्या उद्धट वर्तनाबद्दल आम्ही तक्रार नोंदवली आहे. त्यांनी १० फेब्रुवारी रोजी कोलवा चर्चमध्ये बेकायदेशीर प्रवेश करून फादरना दोन तास कोंडून ठेवले, असा आरोप फर्नांडिस यांनी केला.
फादरना चुकीच्या मार्गाने कोंडून ठेवून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या तीन कलमांचे उल्लंघन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षकावर कठोर कारवाई करून त्यांच्या निलंबनाची आम्ही मागणी केली आहे. त्यांची केवळ बदली करणे ही शिक्षा नाही. कायदा मोडल्याबद्दल त्यांना शिक्षा व्हायलाच हवी. जर पोलीसच कायदा मोडू लागले, तर लोकांनी कोणाकडे न्याय मागायचा? असा प्रश्न फर्नांडिस यांनी उपस्थित केला.
कलम १२७ हे दोन तासांसाठी कोंडून ठेवणे. कलम १९८ हे सरकारी कर्मचाऱ्याने कायद्याचे पालन न करता आपल्या अधिकारांचा गैरवापर करणे. कलम ३५१ हे धमकावण्याचा प्रयत्न करणे. ही कलमे तक्रारीत नोंद केली आहेत.
विक्रम नायक हे चर्चमध्ये एकटे गेले नव्हते, तर २० जणांची पोलीस फौज घेऊन गेले होते. फादरना भेटण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलीस फौज जाते, हे आम्ही पहिल्यांदाच ऐकले आहे, असे फर्नांडिस म्हणाले.