शिवोली येथे स्वयंअपघातात नेपाळी युवकाचा मृत्यू

दोघे जखमी, दुचाकी चालकावर गुन्हा नोंद

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
शिवोली येथे स्वयंअपघातात नेपाळी युवकाचा मृत्यू

म्हापसा : सोनारखेड, मार्ना शिवोली येथे झालेल्या स्वयंअपघात बिबेक चौधरी (२२, रा. मार्ना, शिवोली व मूळ नेपाळ) या युवकाचा मृत्यू झाला. तर, पवन चौधरी (२४) व सागर चौधरी (३२) हे दोघे जखमी झाले असून हणजूण पोलिसांनी अपघातास कारणीभूत दुचाकी चालक सागरविरुद्ध विनावाहन परवाना गाडी चालवणे आणि सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.

अपघात गुरुवार दि. १२ रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडला. तिघेजण आसगावहून मार्ना शिवोलीच्या दिशेने जीए ०३ एजी ५८९० या क्रमांकाच्या अॅक्टिवा स्कुटरवरून जात होते. घटनास्थळी सोनारखेड येथे उतरणीवर दुचाकी चालक सागर चौधरी याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव दुचाकीने प्रथम रस्त्याकडेला एका घराच्या संरक्षक भितीला धडक दिली. नंतर दुचाकीने तिथे पार्क असलेल्या दुचाकीला धडक दिली.

अपघातात दुचाकीवर मागे बसलेले बिबेक चौधरी व पवन चौधरी आणि चालक सागर चौधरी हे तिघेही जखमी झाले. त्यांना तत्काळ शिवोली आरोग्य केंद्रातून म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. तिथे उपचारावेळी बिबेक याचा मृत्यू झाला. गंभीर जखमी पवन चौधरी याला गोमेकॉत हलवण्यात आले. तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तर, संशयित सागर चौधरी याला डिस्चार्ज देण्यात आला.

अपघाताचा माहिती मिळताच हणजूण पोलीस उपनिरीक्षक लिशा खर्बे व सहाय्यक उपनिरीक्षक जितेंद्र राऊळ यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन पंचानामा केला.

दरम्यान, संशयित आरोपी सागर चौधरी हा विना वाहनचालक परवाना गाडी चालवत होता. हे पोलीस चौकशीत आढळून आले. त्यानुसार, पोलिसांनी संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या १०६, २८१ व १२५(अ) आणि मोटार वाहन कायदा कलम ३ अन्वये वाहन चालक परवान्याविना दुचाकी चालवणे, निष्काळजीपणे वाहन हाकणे आणि सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.

दुचाकी मालकावर गुन्हा दाखल होणार

सागर चौधरी याच्याकडे वाहन चालक परवाना नसतानाही त्याला दुचाकी चालवण्यास देण्यात आली. याबद्दल पोलिसांकडून दुचाकी मालकाविरुद्धही गुन्हा नोंद होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत. 

हेही वाचा