बोर्डे-डिचोली येथे बिबट्याला पकडण्यासाठी वन खात्याने लावला पिंजरा

बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
13th February, 11:51 pm
बोर्डे-डिचोली येथे बिबट्याला पकडण्यासाठी वन खात्याने लावला पिंजरा

डिचोली : बोर्डे-डिचोली परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याच्या तक्रारीनंतर वन विभागाने तातडीने दखल घेत शुक्रवारी संध्याकाळी परिसरातील झाडीमध्ये पिंजरा लावला.

वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी रात्रभर संबंधित ठिकाणी पहारा ठेवून बिबट्याच्या हालचाली टिपण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यावेळी बिबट्या दिसला नाही. सकाळी तसेच रात्रीच्या वेळी अनेकांना बिबट्याचे दर्शन झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच परिसरातील काही कुत्र्यांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटनांमुळे नागरिकांनी धास्ती घेतली होती.

विश्वास गावस यांनी वन खात्याकडे पत्राद्वारे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार वन अधिकाऱ्यांनी पाहणी करून पिंजरा बसवला आहे.

दरम्यान, बोर्डे मठ, दत्त मंदिर तसेच शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालय परिसरात नागरिक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू असते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वन विभागाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 

हेही वाचा