सूरज पेंडसे विरुद्ध तिसरा गुन्हा; क्लब गोयाला १४.२३ लाखांचा गंडा

आतापर्यंत उकळली २९.१३ लाख रक्कम

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
सूरज पेंडसे विरुद्ध तिसरा गुन्हा; क्लब गोयाला १४.२३ लाखांचा गंडा

म्हापसा : गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा (जीएसपीसीबी) तोतया अधिकारी सूरज पेंडसे (रा. आसगाव) याच्याविरुद्ध क्लब गोयाच्या मालकाला १४.२३ लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी हणजूण पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. संशयिताविरुद्ध हा तिसरा गुन्हा नोंद झाला असून त्याने आतापर्यंत ५ आस्थापनांकडून २९.१३ लाख रुपये रक्कम उकळला आहे.

याप्रकरणी क्लब गोयाचे मालक हिमांशू मल्होत्रा (रा. वागातोर व मूळ दिल्ली) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. हा आर्थिक फसवणुकीचा प्रकार १६ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १ वा. सुमारास हणजूण -वागातोर येथे घडला होता.

आपण गोवा प्रदूषण मंडळाचा अधिकृत अधिकारी आह. क्लबच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचे परवान्याचे अपग्रेड आणि नूतनीकरण करून देतो असे सांगून फिर्यादीकडून संशयिताने एकूण १४ लाख २३ हजार २०० रुपये उकळले होते.

हणजूण पोलिसांनी याप्रकरणी संशयित सूरज पेंडसे याच्याविरुद्ध या गैरव्यवहार आणि आर्थिक फसवणूक प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या ३१९(२) व ३१८(४) कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सूरज गावस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक साहिल वारंग हे करीत आहेत.

सूरजला अटक केल्यानंतर प्रथम सायबर गुन्हा शाखेकडून संशयित ठगाला कळंगुट पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली होती. कॅफे सीओ टूसह नोहा वागातोर आणि डेल मार मोरजी या रेस्टॉरन्टचे भागीदार फिर्यादी राहुल रामनाथ यांच्याकडून ९ लाख ५९ हजार ५०० रुपये रक्कम उकळली होती. याप्रकरणात ४ फेब्रुवारी रोजी संशयिताला कळंगुट पोलिसांनी अटक केली होती. हा फसवणुकीचा प्रकार १३ डिसेंबर रोजी कळंगुटमध्ये घडला होता.

सूरज पेंडसे याला पुणेतून केली होती अटक

काणकोण येथील एका व्यावसायिकाला ५.०३ लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी सायबर गुन्हा शाखेने संशयित सूरज पेंडसे याला पुणे-महाराष्ट्र येथून गेल्या जानेवारी महिन्यात अटक केली होती. सायबर गुन्हा पोलिसांच्या चौकशीत संशयिताने आपल्या एका साथीदार मैत्रिणीच्या सहाय्याने अशाप्रकारे अनेक रेस्टॉरन्ट व क्लबना आर्थिक गंडा घातल्याचे उघडकीस आले होते. 

हेही वाचा