सुकाणू समिती स्थापनेसाठी प्रक्रिया सुरू; ‘नेट पॉझिटिव्ह पंचायत’ उपक्रमाची होणार प्रभावी अंमलबजावणी

पणजी : गोवा सरकारने ‘नेट पॉझिटिव्ह पंचायत’ (एनपीपी) (NPP) उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि राज्यातील नव्या; अभिनव सौर प्रकल्पांना गती देण्यासाठी राज्य सुकाणू समिती (State Steering Committee (SSC)) स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
ऊर्जा आणि अक्षय ऊर्जा सचिव प्रसाद लोलयेकर (आयएएस) यांच्या अध्यक्षतेखाली सचिवालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत विविध विभागांमधील समन्वय बळकट करणे, जबाबदाऱ्या स्पष्ट करणे आणि एनपीपी आराखड्याची दीर्घकालीन शाश्वतता सुनिश्चित करणे यावर भर देण्यात आला.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्याने स्थापन होणारी सुकाणू समिती विविध विभागांच्या कामकाजावर देखरेख ठेवणार असून, अंमलबजावणी प्रक्रियेचे परीक्षण आणि उत्तरदायित्व निश्चित करण्याचे काम करणार आहे.
पत्रकात नमूद केल्यानुसार, एनपीपी आराखडा हा गोवा ‘एनर्जी व्हिजन २०५०’शी सुसंगत असून; पंचायत स्तरावर स्वच्छ ऊर्जा संक्रमण, ऊर्जा कार्यक्षमता, हवामान बदलास प्रतिसाद आणि शाश्वत विकासाला चालना देण्याचे उद्दिष्ट आहे. राज्याच्या दीर्घकालीन ऊर्जा आणि पर्यावरणीय ध्येयांचे ग्रामस्तरावर रूपांतर करून सामुदायिक स्तरावर कृती घडवून आणण्याचा या उपक्रमाचा हेतू आहे.
बैठकीत विविध विभागांच्या जबाबदाऱ्यांचे तपशीलवार सादरीकरण करण्यात आले. यात ना हरकत प्रमाणपत्रे (NOC) देणे, सविस्तर प्रकल्प अहवालांचे (DPR) परीक्षण व मंजुरी यांचा समावेश आहे. संबंधित विभागांनी अंमलबजावणी सुलभ व्हावी यासाठी वेळेवर अभिप्राय व आवश्यक मंजुरी देण्याचे आश्वासन दिले आहे. राज्याच्या ‘स्वच्छ ऊर्जा रोडमॅप २०५०’ अंतर्गत गोव्याच्या सौर ऊर्जेच्या क्षमतेचा प्रभावी वापर करण्याच्या दिशेने हा निर्णय महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.