पणजीत भव्य मोर्चा

पणजी : चार केंद्रीय कामगार कायदे (Worker Law) मागे घेणे, पंचायत (Panchayat) आणि अन्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, वारंवार एस्मा (ESMA) न लावणे अशा विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसतर्फे (आयटक) (AITUC) गुरुवारी पणजीत भव्य मोर्चा काढण्यात आला.
यावेळी आयटकने केंद्रीय कामगार संघटनांच्या देशव्यापी संपाला पाठिंबा दिला. यावेळी ख्रिस्तोफर फोंसेका, ॲड.सुहास नाईक, राजू मंगेशकर, प्रसन्ना उटगी यांच्यासह राज्यभरातील शेकडो कामगार उपस्थित होते.
यावेळी प्रसन्ना उटगी म्हणाले की, केंद्र सरकारने संमत केलेले चार कामगार कायदे रद्द केले पाहिजेत. हे कायदे कामगारांच्या हिताचे नाहीत. ते कायदे भांडवलदारांच्या फायद्यासाठी तयार करण्यात आले आहेत. राज्यात हे कायदे लागू झाल्यास कामगारांचे महत्त्व कमी होणार आहे. यामुळे कामगारांना ‘हायर अँड फायर’ करणे सोपे होणार आहे. या कायद्यामुळे मालक वर्ग कामगारांना गुलामाप्रमाणे वागणूक देण्याची शक्यता आहे. यासाठी सरकारने हे कायदे मागे घेतले पाहिजेत.
ते म्हणाले, राज्यात फार्मा कंपन्यांतील कामगार संपावर जाऊ नयेत; यासाठी वारंवार एस्मा लावण्यात येतो. यामुळे कामगारांच्या अधिकारांवर गदा येत असल्याने हा कायदा रद्द करणे आवश्यक आहे.
पंचायत, गोवा डेअरी आदी कर्मचाऱ्यांना देखील सातवा वेतन आयोग लागू करणे आवश्यक आहे. देशभरात अकुशल कामगारांना २६ हजार तर कुशल कामगारांना ३१ हजार ५०० रुपये किमान मासिक वेतन करणे, कंत्राटी पद्धतीने भरती बंद करणे, जी रामजी योजना मागे घेऊन त्या ऐवजी पूर्वीची मनरेगा सुरू करणे अशा मागण्या देखील आम्ही केल्या आहेत.