यूपीआयवरून पैसे पाठवण्यास सांगून केली फसवणूक; फोंडा पोलिसांनी नोंदवला अज्ञातांविरुद्ध गुन्हा

पणजी : गोव्यात (Goa) ऑनलाईन फसवणुकीच्या (Online Fraud) घटना वाढू लागल्या आहेत. अशीच एक घटना फोंडा पोलीस स्थानकात (Ponda Police Station) नोंद झाली आहे. ट्रक चालक असल्याचे सांगून अज्ञात व्यक्तीने यूपीआयद्वारे पैसे पाठवण्यास सांगून एकाची २.८० लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी फोंडा पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
सविस्तर माहिती अशी की, एकाने प्रथम मोबाईल फोनवर संपर्क करून मंगळुरूहून छत्तीसगडला माल पोहोचवण्यासाठी वाहन सेवा हवी असल्याचे सांगितले. त्यानंतर अज्ञात व्यक्तीने संपर्क करून आपण चालक असल्याचे सांगितले व ट्रक पुरवत असल्याचे सांगितले.
वेगवेगळ्या फोन क्रमांकावरून संपर्क करून गोड बोलून विश्वास संपादन केला व ट्रकचे भाडे म्हणून २.८० लाख रुपये फोन पे वरील यूपीआयवरून पाठवण्यास सांगितले. त्याच्या भूलथापांना बळी पडून पैसे पाठवल्यावर ट्रक सेवाही पुरवली नाही व पैसे ही परत केले नाहीत.
त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच यासंदर्भात फोंडा पोलीस स्थानकात तक्रार करण्यात आली. फोंडा पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, अधिक तपास उपनिरीक्षक बन्सल नाईक करीत आहेत.
अशा ठगांपासून सावधान!
दरम्यान, फोनवरून संपर्क करून वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे मागून फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. ऑनलाईन फसवणुकीत अडकून हातचे गमावून बसू नये, असे आवाहन केले आहे.