दाबोळी विमानतळ 'घोस्ट एअरपोर्ट' होण्याच्या मार्गावर? : युरी आलेमाव

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
दाबोळी विमानतळ 'घोस्ट एअरपोर्ट' होण्याच्या मार्गावर? : युरी आलेमाव

मडगाव : दक्षिण गोव्यासाठी सर्वदृष्टीने महत्त्वाचे असलेले दाबोळी विमानतळ नौदलाच्या ताब्यात देऊन व्यावसायिक प्रवासी सेवा बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत. यावर राज्य सरकारने तातडीने स्पष्टीकरण द्यावे. तसेच या मुद्द्यावर पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रित लढा देण्याची गरज आहे, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आमदार एल्टन डिकॉस्टा यांच्यासह मडगाव येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजप सरकार दाबोळी विमानतळ 'घोस्ट एअरपोर्ट' करण्याच्या प्रयत्नात असल्याची टीका त्यांनी केली.

दाबोळी विमानतळावरील प्रवासी सेवा बंद करण्याच्या किंवा त्याचे महत्त्व कमी करण्याच्या दिशेने पावले टाकली जात आहेत आणि भाजप सरकारला याची पूर्ण जाणीव आहे. एरोफ्लोट, कतार एअरवेज आणि एअर इंडिया (लंडन गॅटविक) यांसारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी आपली सेवा दाबोळीवरून मोपा विमानतळावर हलवली आहे. यामुळे दक्षिण गोव्याच्या पर्यटनावर आणि अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे. आता हे विमानतळ पूर्णपणे नौदलाच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे समोर येत आहे.

याबाबत विधानसभेतही चर्चा झाली होती, तेव्हा कोणत्याही परिस्थितीत हे विमानतळ बंद होणार नाही आणि दोन्ही विमानतळ सुरू राहतील, असे राज्य सरकारने सांगितले होते. मात्र, आता केंद्र सरकार राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव हे विमानतळ नौदलाच्या हवाली करणार असल्याचे समजते. आम्ही राष्ट्रद्रोही नाही, पण दक्षिण गोव्यातील पर्यटन व नागरिकांच्या हितासाठी हे विमानतळ नागरी सेवांसाठी सुरू राहणे आवश्यक आहे. देशातील इतर अनेक ठिकाणी नौदलाच्या ताब्यातील विमानतळांवरूनही व्यावसायिक प्रवासी सेवा सुरू आहेत, मग दाबोळीसाठीच हा नियम का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यात भाजपचा पराभव झाल्यामुळे सरकार सूडबुद्धीने दाबोळीकडे दुर्लक्ष करत असल्याचा दावा युरी आलेमाव यांनी केला आहे. विमान कंपन्यांना कोणत्या विमानतळावरून सेवा द्यायची हे ठरवण्याचा अधिकार सर्वस्वी त्यांचाच आहे, असे केंद्र सरकारने स्पष्ट केल्यानंतर मुख्यमंत्री कोणत्या आधारावर दाबोळी सुरू राहील, असे आश्वासन देत आहेत, असा प्रश्न आलेमाव यांनी विचारला.

आमदार एल्टन डिकॉस्टा यांनीही या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरले. स्थानिक टॅक्सी चालक आणि हॉटेल व्यावसायिकांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे. दाबोळी विमानतळावरील विमानांची संख्या कमी झाल्याने दक्षिण गोव्यातील शेकडो टॅक्सी चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने केवळ आश्वासने न देता ठोस कृती करावी आणि दाबोळी विमानतळाच्या भवितव्याबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस या संदर्भात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन निवेदन सादर करणार आहेत. जनतेने आणि सर्व राजकीय पक्षांनी या मुद्द्यावर एकजूट दाखवावी, असे आवाहन युरी यांनी केले. राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर जनलढ्याबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा