
मडगाव : मडगाव नगरपालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून अद्याप प्रभागनिहाय आरक्षण आणि प्रभाग फेररचनेबाबतची माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. या प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याने, या आठवड्यात उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले. तसेच फातोर्डासह मडगावमधील प्रभागांतही उमेदवार उभे केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आगामी मडगाव नगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय वातावरण आतापासूनच तापू लागले आहे. यापूर्वी मंत्री दिगंबर कामत यांनी, कोणत्याही क्षणी निवडणुका घेतल्या तरी भाजप त्यासाठी तयार असल्याचे म्हटले होते. पालिका निवडणुकीबाबत गोवा फॉरवर्ड पक्षाची भूमिका मांडताना पक्षाचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनीही आपला पक्ष सज्ज असल्याचे सांगितले. मात्र, नगरपालिकेच्या प्रभागांची फेररचना आणि आरक्षणाबाबत अजूनही स्पष्टता नाही. ही स्पष्टता येण्यासाठी या आठवड्यात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाईल, असे त्यांनी नमूद केले.
भाजपने केवळ सत्तेसाठी मडगाव नगरपालिकेचे प्रभाग २५ वरून २७ करण्याचा घाट घातला आहे. "सध्याचे नगरसेवकच आपली कामे नीट करत नसताना नवीन प्रभागांची काय गरज?" असा सवाल त्यांनी यापूर्वी उपस्थित केला होता. आता हा अस्तित्वाचा लढा असून, फातोर्डासह मडगावातील प्रभागांमध्येही सक्षम उमेदवार उभे केले जातील, असे सरदेसाई यांनी स्पष्ट केले.