विदेशी दारूच्या बाटल्यांवरही मारला डल्ला

पणजी : फोंडा तालुक्यात सध्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, सर्वसामान्यांची घरेही आता सुरक्षित राहिलेली नाहीत. बोरी सर्कलजवळील माजी सरपंच कोस्टास लुईस यांच्या बंगल्यात अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत लाखो रुपयांच्या मालमत्तेवर डल्ला मारला आहे. विशेष म्हणजे, तालुक्यात एकाच दिवसात चोरीची ही तिसरी मोठी घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी माजी सरपंचांच्या बंगल्याच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. बंगल्यात कोणीही नसताना चोरट्यांनी कपाटातील सुमारे १.३ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि २० हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. केवळ दागिने आणि पैशांवरच न थांबता, चोरट्यांनी बंगल्यात असलेल्या सुमारे ६० हजार रुपये किमतीच्या २० विदेशी दारूच्या बाटल्यांवरही डल्ला मारला आहे.
फोंडा तालुक्यासाठी आजचा दिवस गुन्हेगारीच्या दृष्टीने अत्यंत गंभीर ठरला. बोरी येथील या चोरीपूर्वी आज सकाळीच ढवळी आणि उसगाव येथील दोन प्रसिद्ध मंदिरांमध्येही चोऱ्या झाल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. मंदिरांमधील चोऱ्यांची घटना ताजी असतानाच, भरवस्तीतील माजी सरपंचाचा बंगला फोडल्या गेल्याने पोलिसांच्या गस्तीवर आणि सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच फोंडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांना बंगल्याच्या परिसरातच चोरट्यांनी तोडलेले कुलूप सापडले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून ठसे तज्ज्ञ आणि श्वानपथकाच्या मदतीने पुरावे गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असून, वाढत्या चोऱ्यांच्या सत्रावर नियंत्रण मिळवण्याचे मोठे आव्हान आता फोंडा पोलिसांसमोर उभे राहिले आहे.