भारत सोडा नोटीसीकडे दुर्लक्ष; तीन परदेशी नाग‌रिकांची म्हापसा ‌‘डिटेन्शन’ केंद्रात रवानगी

हकालपट्टीपर्यंत ‘डिटेन्शन’ केंद्रात

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
4 hours ago
भारत सोडा नोटीसीकडे दुर्लक्ष; तीन परदेशी नाग‌रिकांची म्हापसा ‌‘डिटेन्शन’ केंद्रात रवानगी

पणजी : भारत सोडा (Leave India) नोटीस बजावूनही देश न सोडणाऱ्या तीन परदेशी नागरिकांना अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.  त्यांना हकालपट्टीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हापसा येथील ‘डिटेन्शन सेंटर’मध्ये ठेवण्यात आले आहे.

मुंबई (Mumbai) येथील परदेशी प्रादेशीक नोंदणी कार्यालयाने (एफआरआरओ) (FRRO) या तिघांना भारत सोडण्याची नोटीस बजावली होती. मात्र, आदेशाचे पालन न झाल्याने त्यांना ताब्यात घेऊन ‘डिटेन्शन सेंटर’मध्ये ठेवण्यात आले आहे. भारतात राहण्याची त्यांची कायदेशीर मुदत संपली होती व त्यांनी देश सोडणे गरजेचे होते. मुदत संपूनही भारतात राहिल्याने कारवाई करावी लागल्याचे सूत्रांनी सांगितले. 

एफआयआरओने देश सोडण्यासाठी दिलेल्या मुदतीत देश न सोडता बेकायदेशीररित्या वास्तव्य करून होते. पणजी येथील एफआयआरओच्या कार्यालयाने त्यांना शोधून काढून  ‘डिटेन्शन’ केंद्रात रवानगी केली. 

वास्तव्य करून राहण्याची मुदत संपूनही अनेक विदेशी बेकायदेशीररित्या गोव्यात वास्तव्य करून राहत आहेत व त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

सध्याच्या स्थलांतर नियमांनुसार बहुतांश पर्यटन व्हिसाधारकांना ९० दिवसांच्या आत देश सोडणे बंधनकारक असते. काही विशिष्ट व्हिसांसाठी १८० दिवसांपर्यंत मर्यादित अपवाद लागू होऊ शकतो. गोवा कार्यालयाच्या अहवालावरून व्हिसा मुदतवाढ अर्जांची तपासणी मुंबईतील एफआरआरओ (Foreigners Regional Registration Office)  कार्यालयात केली जाते. अर्ज फेटाळल्यास देश सोडून जावे लागते. निर्धारित तारखेनंतरही देश न सोडल्यास बेकायदेशीर ठरते व त्यानंतर ‘लीव्ह इंडिया’ नोटीस जारी केली जात असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

‘त्या’ तिघांकडूनही व्हिसा अटींचे उल्लंघन

हल्लीच दोन रशियन महिलांच्या खूनप्रकरणी रशियन नागरिक अलेक्सी लिओनोव्ह याला अटक केली होती. अटक केलेल्या अलेक्सी व खून झालेल्य दोन्ही महिलांच्या व्हिसा अटींचे उल्लंघन झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 

इतर परदेशी नागरिकांच्या व्हिसाची चौकशी 

दरम्यान,  राज्यातील इतर परदेशी नागरिकांच्या व्हिसा स्थितीची चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. काही जण पर्यटन व्हिसावर येऊन नोकरी करत असल्याचे आढळले आहे. तर काहींचा व्हिसा कालावधी संपल्यानंतरही ते देशातच थांबले असल्याचे दिसून आल्याचे अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले.


हेही वाचा