
म्हापसा: हडफडे येथील 'बर्च' क्लब दुर्घटने प्रकरणी संशयित लुथरा बंधूंचा जामीन अर्ज म्हापसा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश द्विजपल पाटकर यांनी फेटाळून लावला आहे. आज गुरुवार १२ जानेवारी रोजी सायंकाळी झालेल्या सुनावणीवेळी लुथरा बंधूंचे नातेवाईक, तसेच सरकारी पक्ष आणि संशयितांतर्फे बाजू मांडणाऱ्या वकिलांची टीम न्यायालयात हजर होती. तसेच पीडित जोशी कुटुंबीयांचे दोन सदस्यही यावेळी उपस्थित होते.
६ डिसेंबर २०२५ रोजी रात्री बर्च क्लबमध्ये घडलेल्या या भीषण आग दुर्घटनेत २५ जणांचा मृत्यू झाला होता, तर सहा जण जखमी झाले होते. मृतांमध्ये ५ पर्यटक आणि क्लबच्या २० कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
संशयितांचे वकील ॲड. पराग राव यांनी निकालावर भाष्य करताना सांगितले की, न्यायालयाने आमचा जामीन अर्ज कोणत्या कारणास्तव फेटाळला आहे, हे निकालाची प्रत मिळाल्यावरच स्पष्ट होईल. त्यानंतर आम्ही त्याचा अभ्यास करू आणि आमच्या अशीलांच्या संमतीनंतरच वरिष्ठ न्यायालयात या निकालाला आव्हान देण्याबाबत निर्णय घेऊ.
पीडितांचे वकील ॲड. सुहास जोशी म्हणाले की, म्हापसा न्यायालयाने लुथरा बंधूंचा जामीन अर्ज नामंजूर केल्यामुळे या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या २५ जणांच्या कुटुंबीयांसाठी आज न्यायाचा दिवस ठरला आहे. संशयितांना या प्रकरणात जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, यासाठी आम्ही यापुढेही प्रयत्नशील राहू.