पेडणे : आमदार आर्लेकर, आजगावकरांना देणार समज!

दामू नाईक : जाहीर आरोप, प्रत्यारोपांची पक्षाकडून दखल

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
14th April, 11:56 pm
पेडणे : आमदार आर्लेकर, आजगावकरांना देणार समज!

पणजी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे (BJP) माजी आणि विद्यमान आमदार यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. सध्या पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर (Pravin Arlekar), माजी मनोहर आजगावकर (Babu Azgaonkar) आणि मांद्रेचे आमदार जीत आरोलकर (Jit Arolkar) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, मी आमदार प्रवीण आर्लेकर आणि माजी मंत्री मनोहर उर्फ बाबू आजगावकर यांना बोलावून समज देणार आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक (Damu Naik) यांनी सांगितले.

‘काही जणांनी निवृत्त होण्याऐवजी पुन्हा पेडणेमध्ये दुकानदारी थाटायला सुरुवात केली आहे. अशांना पेडणेकरांनी जवळ करू नये,’ असे वक्तव्य पेडणेचे भाजप आमदार प्रवीण आर्लेकर यांनी केले होते. मांद्रेचे मगोप आमदार जीत आरोलकर यांनीही, ‘बाहेरचे लोक पुन्हा पेडणेत येऊ लागले आहेत,’ असे विधान केले होते. यावर माजी मंत्री मनोहर आजगावकर यांनी प्रवीण आर्लेकर आणि जीत आरोलकर यांना कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.

प्रवीण आर्लेकर आणि मनोहर आजगावकर हे दोघेही सध्या भाजपमध्येच आहेत. त्यांच्यात वैयक्तिक पातळीवर कोणतेही मतभेद नाहीत. मी दोघांशी चर्चा करून त्यांना समज देईन, असे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी पंचायत मंत्री माॅविन गुदिन्हो यांनीही मगोप आमदार जीत आरोलकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करून भाजपची उमेदवारी घ्यावी, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरही मोठी टीका झाली होती. अशी बेजबाबदार वक्तव्ये केल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा त्यावेळी प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिला होता.

पुढची निवडणूक पेडणेतूनच : आजगावकर

मी पेडणे मतदारसंघात मोठे काम केले आहे. म्हणूनच मी तिथून चार वेळा निवडून आलो. प्रवीण आर्लेकर आणि जीत आरोलकर हे कामापेक्षा राजकारणच जास्त करू लागले आहेत. पेडणेकरांशी माझे २५ वर्षांपासूनचे संबंध आहेत. मागील निवडणूक मी मडगावमधून लढलो म्हणून माझा पराभव झाला. एक पैसाही न घेता मी पेडणेकरांसाठी काम केले आहे. पुढची निवडणूक मी पेडणेतूनच लढवणार, असे मनोहर आजगावकर यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा