विजय सरदेसाई यांना संपूर्ण विषय माहित नाही

पणजी: दाबोळी विमानतळाविरोधात (Dabolim Airport) जीएमआरचे (GMR) लॉबिंग सुरू आहे. दाबोळी विमानतळ नौदलाने (Navy) ताब्यात घ्यावा; यासाठी ते दिल्लीत (Delhi) दबाव आणत आहेत. यामुळे मी राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांच्यासहीत दिल्लीत देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. दाबोळी विमानतळ बंद होणार नाही; याची मला खात्री असल्याचे वाहतूक मंत्री (Transport Minister of Goa) मॉविन गुदिन्हो यांनी सांगितले.
आमदार विजय सरदेसाई यांना संपूर्ण विषय माहित नाही. विषय माहित नसल्यानेच त्यांनी माझा राजीनामा मागितल्याचे गुदिन्हो म्हणाले.दाबोळी विमानतळ बंद होणार असल्याची सध्या राज्यात चर्चा सुरू आहे. नौदल दाबोळी विमानतळ ताब्यात घेऊ इच्छित आहे. सरकारने सात दिवसांत स्पष्टीकरण दिले नाही; तर आंदोलन करण्याचा इशारा गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी दिला आहे. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनीही दाबोळी विमानतळासंदर्भात चिंता व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर बोलताना वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी वरील माहिती दिली. जीएमआर दाबोळी विमानतळ ताब्यात घेण्यासाठी नौदलावर दबाव आणत असल्याचे कळल्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह मी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना भेटलो आणि चर्चा केली. त्यानंतर मी दिल्लीत खासदार सदानंद शेट तानावडे यांच्यासह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना भेटलो आणि निवेदन सादर केले. नौदल दाबोळी विमानतळ ताब्यात घेणार नाही. दाबोळी विमानतळावरून विमान उड्डाणे सुरूच राहणार असल्याचे आश्वासन संरक्षणमंत्र्यांनी दिले असल्याचे गुदिन्हो म्हणाले.