बजाज फायनान्समध्ये नोकरीचे आमिष; फोंडा येथील तरुणाची दोन लाखांची फसवणूक

सायबर भामट्यांचा नवा फंडा

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
6 hours ago
बजाज फायनान्समध्ये नोकरीचे आमिष; फोंडा येथील तरुणाची दोन लाखांची फसवणूक

पणजी  : गोव्यात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना लक्ष्य करून त्यांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. फोंडा येथील शांतीनगर-कुडतरकर नगरी भागातील दर्श शंकरे या तरुणाला 'बजाज फायनान्स'मध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी तब्बल २ लाख १० हजार ८०४ रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी फोंडा पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही फसवणूक २ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घडली. तक्रारदार दर्श शंकरे याला एका अज्ञात मोबाइल क्रमांकावरून फोन आला होता. फोनवरील महिलेने स्वतःची ओळख 'नोकरी डॉट कॉम'ची (Naukri.com) प्रतिनिधी 'प्रियंका शर्मा' अशी करून दिली. तिने दर्शला विश्वास दिला की, त्याची निवड बजाज फायनान्स, गोवा येथील एका पदासाठी करण्यात आली आहे. या खोट्या आश्वासनामुळे तक्रारदार तरुण तिच्या जाळ्यात अडकला.

सुरुवातीला कलचाचणी (Aptitude Test), त्यानंतर मुलाखत, कागदपत्रांची पडताळणी आणि बँक खाते उघडणे अशा विविध तांत्रिक प्रक्रियांच्या नावाखाली संशयित महिलेने दर्शकडून पैशांची मागणी केली. आरोपी महिलेने तक्रारदाराला विश्वासात घेऊन वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे एकूण २,१०,८०४ रुपये युपीआयच्या (UPI) माध्यमातून विविध बँक खात्यांमध्ये भरण्यास भाग पाडले. इतकेच नव्हे तर, या पैशांच्या व्यवहाराचे सर्व तपशील तिने व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवण्यास सांगितले.

नोकरीचे नियुक्ती पत्र मिळेल आणि भरलेले पैसे परत मिळतील या आशेवर असलेल्या तक्रारदाराला जेव्हा दिलेले आश्वासन पूर्ण झाले नाही आणि भरलेली रक्कमही परत मिळाली नाही, तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. अखेर त्याने फोंडा पोलीस स्थानकात धाव घेऊन तक्रार नोंदवली.

फोंडा पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३१९(२) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पोलीस उपनिरीक्षक बन्सल नाईक या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. सुशिक्षित तरुणांनी अशा अनोळखी फोन कॉल्स आणि नोकरीच्या आमिषाला बळी पडू नये, तसेच कोणतेही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी कंपनीची अधिकृत खातरजमा करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा