रोख रक्कम आणि दागिने घेऊन पुन्हा फरार

अलिगढ: माणसाच्या आयुष्यात प्रेम कधी, कुठे आणि कोणावर जडेल याचा नेम नाही, असे म्हटले जाते. मात्र, उत्तर प्रदेशातील अलिगढ जिल्ह्यातून समोर आलेली एक घटना पाहिल्यानंतर तुम्ही देखील डोक्याला हात लावून घ्याल. गेल्या वर्षी आपल्या सख्ख्या जावयासोबत संसार थाटण्यासाठी घरदार सोडून पळालेली सासू आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र, यावेळी तिने आपल्या जुन्या 'प्रेमाला' म्हणजे जावयालाच चुना लावत चक्क स्वतःच्या बहिणीच्या पतीसोबत (मेहुण्यासोबत) पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
'सपना' ही गेल्या काही काळापासून आपल्या विचित्र प्रेमप्रकरणामुळे संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरली आहे. या नाट्याची सुरुवात गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात झाली होती. अलिगढमधील मद्रक पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारी ही महिला आपल्या मुलीच्या लग्नादरम्यान चक्क होणाऱ्या नवरदेवाच्या, म्हणजेच आपल्या जावयाच्या प्रेमात पडली. समाज आणि कुटुंबाची पर्वा न करता, ही सासू आपल्या जावयासोबत, ज्याचे नाव राहुल आहे, पळून गेली होती. त्यावेळी या घटनेने अलिगढसह संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडवून दिली होती. आईनेच मुलीचा संसार उधळल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात होता, मात्र सपना आपल्या निर्णयावर ठाम होती.
सपना आणि राहुल यांनी 'मरेपर्यंत सोबत राहू' अशा आणाभाका घेतल्या होत्या. त्यानंतर ते दोघे बिहारमधील सीतामढी येथे राहू लागले. पती आणि मुलांनी तिला परत आणण्याचे अनेक प्रयत्न केले, पण तिने कोणाचेही ऐकले नाही. मी आता फक्त राहुलची आहे आणि आमचे कोर्ट मॅरेज होणार आहे, असे म्हणत तिने आपल्या सुखी संसारावर पाणी सोडले होते. जवळपास १० महिने हा अजब संसार सुरळीत सुरू होता, पण ६ फेब्रुवारी रोजी या कथेला एक नवीन आणि अनपेक्षित वळण मिळाले.
जावयासोबत राहणाऱ्या या महिलेला आता तिच्या बहिणीचा पती, म्हणजेच मेहुणा अधिक आवडू लागला. राहुलला वाटले होते की सपना फक्त त्याचीच आहे, पण सपनाने त्याच्यासाठी एक मोठा 'प्लॅन' तयार केला होता. ६ फेब्रुवारी रोजी संधी साधून सपनाने राहुलच्या घरातून सुमारे २ लाख रुपये रोख आणि सोन्याचे दागिने घेऊन आपल्या मेहुण्यासोबत पळ काढला. ज्या जावयासाठी तिने जगाचा त्याग केला होता, त्याच जावयाला आता रडत बसण्याची वेळ आली आहे. मेहुण्यासोबत फरार होताना तिने केलेला हा 'डबल गेम' पाहून आता पोलीसही चक्रावून गेले आहेत.
पीडित राहुलने आता याप्रकरणी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली आहे. राहुलचा असा आरोप आहे की, सपनाने त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि आता घरातील ऐवज घेऊन ती दुसऱ्यासोबत फरार झाली आहे. मात्र, या प्रकरणातील गुंतागुंत पाहून पोलिसांनी अद्याप अधिकृत गुन्हा दाखल केलेला नाही. दरम्यान, सपनाचा मूळ पती, ज्याला तिने जावयासाठी सोडले होते, त्याने अलीकडेच दुसरे लग्न करून आपले आयुष्य सावरल्याची माहिती समोर येत आहे.
प्रेमात अंध होणे ही म्हण जुनी झाली असली, तरी सपनाच्या या प्रकरणाने 'प्रेमाचे रंग' किती लवकर बदलू शकतात, याचे जिवंत उदाहरण समाजासमोर मांडले आहे. जावयाकडून मेहुण्याकडे वळलेला हा प्रेमाचा प्रवास नक्की कुठे थांबणार, याचीच चर्चा आता अलिगढमध्ये रंगली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत असून, ही 'सासू' पुन्हा एकदा कोणाच्या प्रेमात पडणार की कायद्याच्या कचाट्यात अडकणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.