आता संमतीशिवाय पर्यटकांसोबत फोटो किंवा सेल्फी काढणाऱ्यांची खैर नाही!

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी गोवा पोलिसांचे कडक पाऊल

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
08th February, 03:37 pm
आता संमतीशिवाय पर्यटकांसोबत फोटो किंवा सेल्फी काढणाऱ्यांची खैर नाही!

पणजी : देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर महिला पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पर्यटकांची छेडछाड आणि त्यांच्या खासगी क्षणांत बाधा आणणाऱ्या प्रवृत्तींना चाप लावण्यासाठी गोवा पोलिसांनी आता 'नो कन्सेंट, नो सेल्फी' (संमती नाही, तर सेल्फी नाही) हे धोरण अत्यंत कडकपणे राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे कोणत्याही पर्यटकाचा, मग तो भारतीय असो वा परदेशी, त्याच्या परवानगीशिवाय त्याचा फोटो काढल्यास किंवा सेल्फीसाठी आग्रह धरल्यास पोलिसांकडून थेट अटक करण्याची कारवाई केली जाणार आहे.


Forced selfies with foreigners on beaches to invite detention: Goa Police -  The Tribune


बागा बीचवर तामिळनाडूच्या पर्यटकांना कोठडी 

या मोहिमेचा भाग म्हणून शुक्रवारी उत्तर गोव्यातील प्रसिद्ध बागा बीचवर पोलिसांनी कारवाई करत तामिळनाडूतील दोन पुरुष पर्यटकांना ताब्यात घेतले. हे दोघेही किनाऱ्यावर फिरणाऱ्या इतर पर्यटकांचे त्यांच्या संमतीशिवाय फोटो काढत होते आणि त्यांना त्रास देत होते. पोलिसांनी त्यांना 'भारतीय नागरिक सुरक्षा संहिता' (BNSS) च्या कलम १७० अंतर्गत प्रतिबंधात्मक कोठडीत घेतले आहे. हे कलम पोलिसांना विना वॉरंट अटक करण्याचे अधिकार देते. या कारवाईमुळे किनाऱ्यावर फिरणाऱ्या पर्यटकांना त्रास देणाऱ्यांमध्ये कायद्याचा वचक राहील. 



सोशल मीडियावरील गैरवापर आणि गुन्हेगारी 

गोव्यातील पर्यटन प्रतिमेला तडा देणाऱ्या काही गंभीर घटना नुकत्याच समोर आल्या आहेत. नुकतेच कळंगुट बीचवर एका परदेशी महिला पर्यटकाचे पोहतानाचे चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या अलिस्तो लोबो नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याने महिलेच्या संमतीशिवाय व्हिडिओ बनवून पर्यटन क्षेत्राची बदनामी केल्याचा आणि महिलेचा विनयभंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ७९ आणि ३५६(२) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याशिवाय ओडिशामधील दोन पर्यटकांनाही रशियन महिलेची छेड काढल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.



पोलिस प्रशासनाची भूमिका आणि खबरदारी 

गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये परप्रांतीय पर्यटक परदेशी महिलांना सेल्फीसाठी बळजबरी करताना दिसत आहेत. अशा प्रकारच्या कृत्यांमुळे जागतिक स्तरावर गोव्याची प्रतिमा मलीन होत आहे. त्यामुळे आता केवळ ताकीद न देता, संमतीशिवाय फोटो काढणाऱ्यांना २४ तास प्रतिबंधात्मक कोठडीत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तर गोव्यातील किनारी भागात पोलिसांची गस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली असून, साध्या वेशातील पोलीसही तैनात करण्यात आले आहेत.




सुरक्षेचा प्रश्न आणि पर्यटन खात्याचे निर्देश

 पर्यटन हंगामाच्या सुरुवातीलाच काही धक्कादायक घटना घडल्या होत्या. नोव्हेंबर २०२५ मध्ये हरमल (आरंबोल) बीचवर परदेशी महिलांशी अश्लील चाळे करणाऱ्या टोळीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तसेच एका १९ वर्षीय विद्यार्थिनीने गोव्यात तिला आलेल्या भयानक अनुभवाबद्दल सोशल मीडियावर माहिती दिली होती.  एका पर्यटकाने तिच्या वंशावरून वर्णद्वेषी टिप्पणी केली होती. या सर्व घटनांची दखल घेत पर्यटन खात्याने पोलीस महासंचालकांना पत्र लिहून किनाऱ्यांवरील सुरक्षा वाढवण्याचे निर्देश दिले होते.  गोव्यातील पर्यटन केवळ निसर्गावर नव्हे, तर येथील सुरक्षिततेच्या अनुभवावर टिकून आहे. पोलिसांनी उचललेले हे पाऊल भविष्यात महिला पर्यटकांना अधिक निर्भयपणे फिरण्यास मदत करेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.


हेही वाचा