कागदपत्रांची तपासणी सुरू : सहकार निबंधक सादर करणार अंतिम अहवाल

पणजी : तिरुमला तिरुपती सहकारी क्रेडिट सोसायटीने (Tirumala Tirupati multi state cooperative credit society limited Goa) सहकार निबंधक कार्यालयाकडे सोसायटीशी संबंधित अधिक कागदपत्रे सादर केली आहेत. या कागदपत्रांची सध्या तपासणी सुरू आहे. नव्याने कागदपत्रे सादर करण्यात आल्यामुळे सरकारला अंतिम अहवाल सादर करण्यास सहकार निबंधकांना आता थोडा विलंब होणार आहे.
तिरुमला तिरुपती क्रेडिट सोसायटीने सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी करून खात्याला अहवाल सादर करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. त्यानुसार अहवाल तयार करण्याचे काम सहकार निबंधक कार्यालयाकडून सुरू आहे, अशी माहिती सहकार निबंधक आशुतोष आपटे यांनी दिली.
नोटिसा बजावूनही ऑडिट अहवाल आणि आवश्यक कागदपत्रे सादर न केल्यामुळे सहकार निबंधकांनी तिरुमला तिरुपती मल्टीस्टेट सहकारी क्रेडिट सोसायटीची एनओसी रद्द करण्याचा आदेश जारी केला होता. यामुळे सोसायटीला गोव्यात १३ शाखा सुरू करण्यासाठी दिलेली मान्यता रद्द झाली, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या घडामोडींनंतर सोसायटीच्या संचालक मंडळाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी ऑडिट अहवाल आणि मागितलेली कागदपत्रे तातडीने सादर करण्याचे निर्देश सोसायटीच्या संचालक मंडळाला दिले. त्यानंतर प्रतिनिधी मंडळाने सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांचीही भेट घेतली.
तिरुमला तिरुपती सोसायटीला गोव्यात १३ ठिकाणी शाखा सुरू करण्यासाठी दिलेली एनओसी रद्द करण्याचा आदेश गेल्या मंगळवारी देण्यात आला होता. या निर्णयामुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली होती. सोसायटीला २०२३, २०२४ आणि २०२५ मध्ये वारंवार नोटिसा बजावण्यात आल्या होत्या, मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने अखेर एनओसी रद्द करण्याची कारवाई करण्यात आली होती.
क्षमा पत्र, कागदपत्रे सादर
ऑडिट अहवाल आणि कागदपत्रांच्या तपासणीनंतरच पुढील निर्णय घेतला जाणार आहे. यानंतर सोसायटीचे गोव्यातील प्रतिनिधी, संचालक आणि अधिकाऱ्यांनी सहकार निबंधकांची भेट घेऊन कागदपत्रे सादर केली आहेत, तसेच पत्र लिहून या विलंबाबद्दल माफीही मागितली आहे.