
पणजी : गोवा सरकारतर्फे (Goa Government) १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर (Social Media) बंदी आणण्याबाबत विचार सुरू आहे. याबाबत शिक्षक (Teachers) पालक तज्ज्ञ तसेच अन्य भागधारकांची मते लक्षात घेऊनच अंतिम निर्णय घेतला जाईल.
हा विषय केंद्राच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये (Delhi) जाऊन केंद्रीय आयटी मंत्र्यांसोबत देखील चर्चा केली जाणार असल्याचे; आयटी मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले. शुक्रवारी त्यांनी याविषयी माध्यमांशी संवाद साधला.
खंवटे म्हणाले की, सोशल मीडियामुळे मुलांचे लक्ष विचलित होत आहे. असे प्लॅटफॉर्म मुलांच्या मानसिक, सामाजिक सुरक्षेबाबत धोका ठरत आहेत. तसेच यामुळे सायबर गुन्हेगारीचा धोका देखील उद्भवत आहे. यासाठी सरकारचा एक समिती नेमण्याचा विचार सुरू आहे. यामध्ये शिक्षक, पालक तसेच या क्षेत्रातील अन्य भागधारक असतील. ही समिती या विषयावर अहवाल सादर करेल. त्यानंतर आम्ही केंद्राशी बोलणी करणार आहोत.
ते म्हणाले, जागतिक स्तरावर काही देशांनी अशी बंदी आणली आहे. आपल्याला विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी चांगले युवक निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी अशा गोष्टींवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. सध्या बंदी बाबत प्राथमिक स्तरावर काम सुरू आहे. बंदी कोणत्या सोशल मीडियावर आणायची, कशी आणायची याबाबत शिक्षण, सामाजिक व अन्य क्षेत्रातील भागधारकांचे विचार लक्षात घेतले जात आहेत.
तत्पूर्वी व्ही. एम. साळगावकर कायदा महाविद्यालयात झालेल्या कन्व्हर्ज ३.० या कार्यक्रमात त्यांनी बदलते तंत्रज्ञान आणि मनुष्यांनी एकत्र काम करणे आवश्यक असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी संधीचा योग्य वापर करून ज्ञानासह कौशल्य विकसित करण्याचा सल्ला त्यांनी दिला. यावेळी डॉ. शाबेर अली, डॉ. रंजना फेर्रांव, डॉ. नियान माचॉंन यांनी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले.