गोव्यात सायबर, ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढल्या; अनेकांनी गमावले लाखो रुपये

ऑनलाईन, सायबर व्यवहार करताना सतर्कता बाळगावी

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
13th February, 10:37 am
गोव्यात सायबर, ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढल्या; अनेकांनी गमावले लाखो रुपये

पणजी : गोव्यात (Goa) गेल्या काही दिवसांत सायबर (Cyber), ऑनलाईन (Online) फसवणुकीच्या (Fraud) घटना वाढू लागल्या आहेत. या माध्यमातून अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. अनेकजण फसव्या भुलथापांना बळी पडून हातचे लाखो रुपये गमावून बसले आहेत. 

फोनवरून संपर्क साधून नोकरी देण्याच्या बहाण्याने ऑलनाईन पैसे पाठवण्यास सांगणे, वाहन पुरवण्यासाठी यूपीआयवरून पैसे पाठवण्यास सांगणे, मॅट्र‌िमॉनियल (Matrimonial) साईटवरून मैत्री करून पैसे लाटणे, ई वाहतूक चलनाच्या माध्यमातून फसवणूक करणे; अशा विविध पद्धती वापरून अनेकांचे कष्टाचे लाखो रुपये लाटण्यात आले आहेत. 

पोलीस स्थानकांत नोंद झालेल्या गेल्या काही दिवसांतील या फसवणुकीच्या ठळक घटना खालीलप्रमाणे आहेत. ऑनलाईन, सायबर व्यवहार करताना सतर्कता बाळगणे किती गरजेचे आहे ते ही या घटना अधोरेखित करीत आहेत. 

ऑनलाईन ‘मॅट्र‌िमोनियल फसवणुकीत गमावले १.३९ लाख 

ऑनलाईन ‘मॅट्रिमोनियल’ (Matrimonial) फसवणुकीच्या जाळ्यात अडकून इंदिरा नगर, चिंबल येथील एका युवतीने १.३९ लाख रुपये महिलेने गमावले. ‘मॅट्रिमोनियल’ साईटवरून युवती एका युवकाच्या संपर्कात आली. त्यानंतर जवळीक वाढताच युवकाने किंमती साहित्य पाठवत असल्याचे सांगितले. त्यानंतर तिला फोन यायला लागले व कॉरियर एजंट व कस्टम अधिकारी बोलत असल्याचे सांगून पार्सल पाठवण्यासाठी ऑनलाईन पैसे पाठवण्यास सांगितले. पैसे पाठवूनही किंमती साहित्य येत नाही व संपर्क क्रमांक बंद असल्याचे दिसून येताच युवतीने जुने गोवे पोलीस स्थानकात (Old Goa Police Station)  तक्रार नोंदवली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. 

वाहन पुरवण्याच्या बहाण्याने २.८० लाखांची फसवणूक 

फोंडा पोलीस स्थानकात नोंद झालेल्या या घटनेत वाहन पुरवण्याच्या नावाखाली संपर्क करून २.८० लाख रुपये लाटण्यात आले. एकाने प्रथम मोबाईल फोनवर संपर्क करून मंगळुरूहून छत्तीसगडला माल पोहोचवण्यासाठी वाहन सेवा हवी असल्याचे सांगितले. त्यानंतर अज्ञात व्यक्तीने संपर्क करून आपण चालक असून ट्रक पुरवत असल्याचे सांगितले. वेगवेगळ्या फोन क्रमांकावरून संपर्क करून गोड बोलून विश्वास संपादन केला व ट्रकचे भाडे म्हणून २.८० लाख रुपये फोन पे वरील यूपीआयवरून पाठवण्यास सांगितले. 

वास्कोत दोघांना ४.१४ लाख रुपयांचा फटका

वास्को पोलीस स्थानकात नोंद झालेल्या दोन घटनांत दोघांना ४.१४ लाख रुपये गमवावे लागले. एकाने मोबाईल फोनवर संपर्क करून बॅंक अधिकारी असल्याचे सांगून मुंडवेल, वास्कोतील व्यक्तीला एपीके फाईल डाऊनलोड करायला सांगितली. फाईल डाऊनलोड करताच त्याच्या बॅंक खात्यातील २.३१ लाख रुपये वजा झाले व फटका बसला. अन्य एका घटनेत धाकतळे, वास्को येथील एका व्यक्तीला अज्ञाताने आरटीओ ई चलनाची एपीके फाईल पाठवली. फाईलमध्ये त्याच्या भावाचा फोटो असल्याने फाईल उघडली. फाईल उघडताच बॅंक खात्यातून १.८४ लाख रुपये बॅंक खात्यातून कमी झाले. 

फोंडा येथे नोकरीच्या आमिषाने २.१० लाख लाटले

फोंडा पोलीस स्थानकात नोंद झालेल्या तक्रारीनुसार, दर्श शंकरे या युवकाला ‘बजाज फायनान्स’मध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून २.११ लाख रुपयांचा गंडा घातला. नोकरी डॉट कॉम या साईटवरून त्याला संपर्क करण्यात आला होता. याप्रकरणी एका महिलेविरुद्ध फोंडा पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. 

अधिकारी असल्याची बतावणी करून ५ जणांकडून उकळले २९.१३ लाख

गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा तोतया अधिकारी सूरज पेंडसे याने ५ जणांची फसवणूक करून एकूण २९.१३ लाख रुपये उकळले. क्लब गोयाला मालकाकडून १४.२३ लाख रुपये घेतल्याचे चौकशीत पुढे आले. काणकोण येथील एका व्यावसायिकाला ५.०३ लाखांचा गंडा घातल्याच्या तक्रारीनंतर सायबर गुन्हा शाखेने सूरज पेंडसे याला पुणे, महाराष्ट्र येथून अटक केली होती. एकूण याठिकाणी नमूद केलेल्या या फसवणुकीच्या घटना खूप काही सांगून जातात. ऑनलाईन, सायबर व्यवहार करताना सतर्कता बाळगणे गरजेचे असल्याचे या फसवणुकीच्या घटना दर्शवतात.  

ऑनलाईन, सायबर व्यवहार करताना सतर्कता बाळगावी

दरम्यान, या वाढत्या फसवणुकीच्या प्रकारांच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन, सायबर व्यवहार करताना लोकांनी सतर्कता बाळगावी.  अज्ञातांच्या भूलथापांना बळी पडून हातचे गमावून बसू नये; असे आवाहन पोलिसांनी केले आहे. मुख्य म्हणजे शिक्षित युवावर्गही अशा फसवणुकीच्या जाळ्यात अडकतात ही खरी चिंतेची बाब असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.  

हेही वाचा