
पणजी: गोव्यात उत्सवांची आणि साहसी खेळांची दुहेरी पर्वणी पाहायला मिळत आहे. आजपासून जगप्रसिद्ध 'कार्निव्हल २०२६'ची सुरुवात होत आहे, तर दुसऱ्या बाजूला उद्यापासून (शनिवार-रविवार) मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर 'F4 इंडियन चॅम्पियनशिप' ही आंतरराष्ट्रीय दर्जाची मोटरस्पोर्ट्स स्पर्धा पार पडणार आहे. या दोन्ही मोठ्या आयोजनांमुळे गोव्यात पर्यटकांचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

राज्यातील बहुप्रतिक्षित 'कार्निव्हल २०२६' ला आज, १३ फेब्रुवारीपासून दिमाखात सुरुवात होत आहे. पर्यटन विभागाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, यावर्षीच्या महोत्सवात पारंपरिक चित्ररथ मिरवणूक (फ्लोट परेड) आणि गोव्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या महोत्सवाचा मुख्य पडदा आज पर्वरी येथील दिमाखदार कार्यक्रमाने उघडला जाणार आहे. १३ ते १७ फेब्रुवारी या पाच दिवसांच्या कालावधीत संपूर्ण गोव्यामध्ये विविध ठिकाणी कार्निव्हलचा आनंद लुटता येईल. मोठ्या प्रमाणावर होणारा लोकसहभाग आणि पर्यटकांची गर्दी लक्षात घेता प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.

दरम्यान, उत्तर गोव्यातील मोपा येथे एक नवा इतिहास रचला जाणार आहे. येत्या १४ आणि १५ फेब्रुवारी रोजी मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विशेष रेसिंग सर्किटवर 'F4 इंडियन चॅम्पियनशिप' रंगणार आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुवारी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या तयारीचा आणि तांत्रिक सज्जतेचा सविस्तर आढावा घेतला. 'रेसिंग प्रमोशन्स प्रायव्हेट लिमिटेड' या आयोजकांसह सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी रेसिंग गाड्यांची आणि ट्रॅकची पाहणी केली.

या आंतरराष्ट्रीय मोटरस्पोर्ट्स स्पर्धेच्या आयोजनामुळे गोव्यातील पर्यटनाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. अशा जागतिक दर्जाच्या स्पर्धांमुळे राज्यात केवळ क्रीडा संस्कृती रुजणार नाही, तर स्थानिकांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधीही उपलब्ध होतील. एकाच वेळी सांस्कृतिक वारसा जपणारा कार्निव्हल आणि आधुनिक खेळाचा थरार देणारी F4 रेसिंग यामुळे गोव्याचे नाव पुन्हा एकदा जागतिक नकाशावर ठळकपणे झळकणार आहे.

दरम्यान कार्निव्हलमुळे शनिवारी, १४ फेब्रुवारी रोजी पणजीतील वाहतुकीत बदल करण्यात आले असून पोलिसांनी विशेष ट्रॅफिक ॲडव्हायजरी जारी केली आहे.
* शहरात येणारी वाहतूक: न्यू पाटो ब्रिजवरून येणारी वाहने दयानंद बांदोडकर पुतळ्यापाशी वळवण्यात येतील. पुढे महात्मा गांधी (MG) रोड किंवा चर्च स्क्वेअरमार्गे प्रवाशांना ऐच्छिक ठिकाणी जाता येईल.
* शहराबाहेर जाणारी वाहतूक: पणजीबाहेर जाणारी वाहने कला अकादमी किंवा कांपाल येथून वळवली जातील. प्रवासी १८ जून रोड-कॉर्टिन किंवा भाटले-मळा रोडमार्गे बाहेर पडू शकतील.
* रस्ते बंद: परेडच्या मार्गावरील काही मुख्य रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहतील, तर काही मार्ग फक्त एक्झिटसाठी वापरले जातील.