गोवा कॅथलिक संघटनेची डीजीपीकडे तक्रार

पणजीः कोलवा चर्चमध्ये (Colva Church) पोलीस फौज घेवून जाऊन पाद्री पी. लोबो यांना दोन तास कोंडून ठेवणे हे कायद्याचे उल्लंघन आहे. पोलीस महासंचालकांनी याची दखल घेऊन पोलीस निरीक्षक (Police Inspector) विक्रम नाईक यांना निलंबित करून त्यांच्यावर कायदेशीवर कारवाई करावी, अशी मागणी गोवा कॅथलिक संघटनेचे (कॅग) अध्यक्ष सिरील फर्नांडिस यांनी केली आहे.
कॅग संघटनेने कोलवा चर्चमध्ये झालेल्या घटनेसंदर्भात कोलवाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक विक्रम नाईक यांच्या विरोधात पोलीस महासंचालकांकडे तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल केल्यानंतर त्यांनी यासंदर्भात माहिती दिली. या वेळी कॅगचे दक्षिण गोवा उपाध्यक्ष मेल्विन फर्नांडिस उपस्थित होते.
विक्रम नाईक यांनी केलेल्या वर्तनासंदर्भात तक्रार नोंद केली आहे. त्यांनी १० फेब्रुवारीला कोलवा चर्चमध्ये बेकायदा प्रवेश करून पाद्री पी. लोबो यांना दोन तास कोंडून ठेवले, असा आरोप फर्नांडिस यांनी केला. कोंडून ठेवून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या तीन कलमांचे उल्लंघन केल्याचे आम्ही तक्रारीत म्हटले आहे.
त्यासाठी पोलीस निरीक्षकाविरोधात कठोर कारवाई करून निलंबित करण्याची मागणी केली आहे. बदली करणे ही शिक्षा नाही. कायद्याचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. जर पोलीस कायदे मोडायला लागले तर लोकांनी कुणाकडे न्याय मागावा, असा प्रश्न फर्नांडिस यांनी केला.