
पणजी : करिअरची संधी देण्याचे भासवून मूळ उत्तरप्रदेश मधील एका २३ वर्षीय युवतीची मानसिक, भावनिक व वैयक्तिक फसवणूक केल्याच्या आरोपाखाली उत्तर गोवा पोलिसांनी एका माजी मंत्र्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हा फसवणुकीचा प्रकार ऑगस्ट २०१९ ते जानेवारी २०२६ दरम्यान घडला आहे. बार्देश तालुक्यात वास्तव्यास असलेल्या युवतीची ऑगस्ट २०१९ मध्ये या माजी मंत्र्यांसोबत ओळख झाली. त्यावेळी करिअर संधी देण्याचे आमिष संशयिताने तिला दाखवले.
नंतर संशयितासोबत राहत असताना वरील आश्वासन देत अप्रामाणिकपणे व जाणूनबुजून आपला त्याने लैंगिक छळ केला, गैरवर्तन आणि शारीरिक शोषण केले. यामुळे आपली प्रतिष्ठा आणि शारीरिक सचोटी धोक्यात आली.
संशयित हा दिलेले आश्वासन पूर्ण करण्यात अपयशी ठरला. त्याने आपली फसवणूक केली. शिवाय मानसिक आणि भावनिक नुकसान पोहोचवले, असा आरोप पीडित युवतीने तक्रारीत केला आहे.
या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संशयित माजी मंत्र्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ६९, ७५(२) व ३१८ (४) अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.