मुरगाव : दोघांनी लुबाडल्याने वृद्धाने कवटाळले मृत्यूला

आलेक्सियो गुदिन्हो आत्महत्येप्रकरणी अब्दुल खानला अटक

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
15th February, 11:07 pm
मुरगाव : दोघांनी लुबाडल्याने वृद्धाने कवटाळले मृत्यूला

वास्को : सासमोळे-बायणा येथील आलेक्सियो गुदिन्हो यांच्या आत्महत्येस (suicide) येथील अब्दुल खान व एक अज्ञात व्यक्ती कारणीभूत असल्याची तक्रार गुदिन्हो यांच्या मुलीने केल्यानंतर वास्को पोलिसांनी (Vasco police) अब्दुल खान याला अटक केली आहे. आलेक्सियो गुदिन्हो (७२) यांनी तीन दिवसांपूर्वी आपल्या इमारतीच्या गच्चीवर गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल खान व अज्ञात व्यक्तीने गुदिन्हो यांना कर्ज (loan) घेण्याच्या बहाण्याने एका बँकेत नेले होते. त्यानंतर गुदिन्हो यांची फसवणूक (fraud) करून बँकेत खाते उघडण्यात आले. त्या दोघांनी गुदिन्हो यांच्या बँक खात्याचे पासबुक, एटीएम कार्ड आपल्या ताब्यात घेतले. त्यानंतर त्या एटीएम कार्डचा वापर करून खात्यातील रक्कम काढून फसवणूक केली. या दरम्यान त्या अज्ञात व्यक्तीने मोबाईल फोनवरून गुदिन्हो यांच्या व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधून आपण बृहन्मुंबई पोलीस असल्याचे भासविले. त्यांना सतत व्हिडिओ कॉल करून त्यांची सतावणूक केली. तसेच मुंबई पोलीस खात्याच्या गुन्हे शाखेची एफआयआरची प्रत पाठविली. ज्यामध्ये गुदिन्हो यांचा आधारकार्ड क्रमांक अश्लील व्हिडिओच्या बेकायदेशीर जाहिरातीमध्ये गुंतला आहे, त्याद्वारे लोकांना संदेश पाठविण्यात येत आहेत, अशाप्रकारे खान व त्या अज्ञात व्यक्तीने गुदिन्हो यांना त्रास दिला. जेणेकरून गुदिन्हो हे भीतीच्या सावटाखाली गेले. त्याच भीतीपोटी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

या प्रकरणी वास्को पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक प्लेटो कार्व्हालो पुढील तपास करत आहेत. 

हेही वाचा