मिराबाग येथील बंधाऱ्याविरोधात संगमेश्वर तीरावर जनजागृती

नदी, निसर्ग वाचवण्यासाठी आंदोलक आक्रमक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
15th February, 11:51 pm
मिराबाग येथील बंधाऱ्याविरोधात संगमेश्वर तीरावर जनजागृती

संगमेश्वरतीरी बंधाऱ्याविरोधात जागृतीसभेत बोलताना ग्रामस्थ. (संदीप मापारी)

सांगे : मिराबाग-सावर्डे (Mirabag-Sawarde) येथील प्रस्तावित बंधाऱ्यामुळे केवळ स्थानिक गावच नव्हे, तर गोव्याचे नैसर्गिक अस्तित्व धोक्यात आले आहे. सरकारने लोकांना रस्त्यावर उतरण्यास भाग पाडले असून, हा प्रकल्प रद्द होईपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, अशा तीव्र भावना आंदोलकांनी व्यक्त केल्या. महाशिवरात्रीचे औचित्य साधून सांगे येथील संगमेश्वर तीरावर जमून आंदोलकांनी या प्रकल्पाविरोधात जनजागृती केली.
आंदोलनाचा आज सातवा दिवस असून, विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या लढ्याला पाठिंबा दिला आहे. यावेळी बोलताना आंदोलकांनी सरकारवर जोरदार टीका केली. रामा काणकोणकर म्हणाले, सरकार देव आणि धर्माचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी करते. आमची नदी आणि निसर्ग नष्ट करण्याचा हा प्रयत्न आम्ही हाणून पाडू. आम्ही बंधाऱ्यासाठी एक इंचही जागा देणार नाही. संकेत भंडारी म्हणाले, कोणताही अभ्यास न करता केवळ स्वतःचे खिसे भरण्यासाठी नदी आणि इतिहासाचे अस्तित्व पुसून टाकले जात आहे.
ज्येष्ठ आंदोलक आपा नाईक यांनी सांगितले की, या नद्या आमच्या माता आहेत. साळावली धरणाद्वारे आम्ही आधीच पाणी दिलेले आहे, मग आता पुन्हा नद्यांचे तुकडे करून सरकारला काय साध्य करायचे आहे?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सांगे नगरपालिकेचा आंदोलनाला पाठिंबा
सांगेचे नगरसेवक मॅथ्यू डिकॉस्टा यांनी या आंदोलनाला अधिकृत पाठिंबा जाहीर केला. आज लोक महाशिवरात्रीनिमित्त मंदिरात दर्शनाला जातात, पण सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे गोमंतकीयांना आपली शेती आणि गाव राखण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे, असे त्यांनी खेदाने नमूद केले.
संगमेश्वराला साकडे
आंदोलकांनी यावेळी संगमेश्वर चरणी गऱ्हाणे घालून, सरकारला हा विनाशकारी प्रकल्प मागे घेण्याची सद्बुद्धी मिळावी अशी प्रार्थना केली. या आंदोलनाला गोव्यातून वाढता पाठिंबा मिळत असल्याने सरकार आता काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा