मुख्यमंत्री डॉ. सावंत : जुने गोवे येथे गोवेश्वर महाशिव मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा

पणजी : जुने गोवे (Old Goa) येथे नव्याने साकारलेल्या गोवेश्वर महाशिव मंदिरामुळे (Goveshwar Mahashiv Temple) राज्याच्या आध्यात्मिक पर्यटनाला (Spiritual tourism) मोठी ऊर्जा मिळेल. हे मंदिर केवळ भक्तीचे केंद्र नसून राज्यात आध्यात्मिक वातावरण निर्मितीसाठी प्रेरक ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
जुने गोवे येथे रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या दिव्य उपस्थितीत गोवेश्वर महाशिव मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन
या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे बारा ज्योतिर्लिंगांची स्थापना करण्यात आली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, आता गोमंतकीयांना ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी महाराष्ट्र किंवा कर्नाटक अशा विविध बारा ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही. ज्यांना बारा ज्योतिर्लिंगांची यात्रा करणे शक्य नाही, त्यांच्यासाठी गोवेश्वर मंदिराची भेट ही संपूर्ण यात्रेसारखीच फलदायी ठरेल.
गोवेश्वर महाशिव मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. या मंदिराच्या बांधकामात कुठेही लोखंडाचा वापर करण्यात आलेला नाही. संपूर्ण मंदिर उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध चुनार दगडांपासून बनवण्यात आले आहे. मंदिरात ६ फूट उंचीची भव्य शिवपिंड उभारण्यात आली आहे.
दरम्यान, या सोहळ्यासाठी गोवा, महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा आणि कर्नाटक राज्यातून हजारो भाविक उपस्थित होते. भाविकांच्या वाहनांच्या रांगा जुने गोवे ते पणजी राष्ट्रीय महामार्गापर्यंत लागल्या होत्या. याप्रसंगी देशातील विविध प्रांतांतील साधू-संत आणि मान्यवर उपस्थित होते. राज्यपालांनी संपूर्ण मंदिर आणि मठाची पाहणी करून व्यवस्थेचे कौतुक केले.
‘गोवेश्वर महिमा संहिता’ ग्रंथाचे लोकार्पण
या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांच्या हस्ते ‘गोवेश्वर महिमा संहिता’ या ग्रंथाचे लोकार्पण करण्यात आले. हा ग्रंथ स्वतः नरेंद्राचार्य महाराज यांनी लिहिला आहे. १४०० पानांच्या या ग्रंथात गोव्याचा वैदिक वारसा आणि इतिहासाचा सखोल उल्लेख असून तो धार्मिक इतिहासाचा एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरणार आहे.