
पणजी : डिचोली येथील मुस्लिमवाडा भागात शनिवारी रात्री एका ग्राफिक डिझाईनच्या दुकानाला भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली. रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास लागलेल्या या आगीत दुकानातील संगणक, लॅपटॉप आणि इतर महागडे साहित्य जळून खाक झाले असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आगीची तीव्रता एवढी भीषण होती की बघता बघता संपूर्ण दुकान आगीच्या विळख्यात सापडले. या आगीमध्ये एक लॅपटॉप, दोन संगणक संच, छपाईसाठी वापरली जाणारी यंत्रसामग्री आणि ग्राफिक डिझाईनसाठी लागणारे सर्व साहित्य जळून पूर्णपणे नष्ट झाले आहे. या आगीत साधारणपणे ४.५ ते ५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक रहिवाशांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि अग्निशमन दलाला पाचारण केले. स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे ही आग अधिक पसरली नाही आणि दुकानाबाहेर उभ्या असलेल्या वाहनांचे मोठे नुकसान टळले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.