काँग्रेसने गोवा फॉरवर्डच्या प्रस्तावावर तत्काळ निर्णय घ्यावा: विजय सरदेसाई

२०२७च्या विधानसभा निवडणुकीत युतीचेच सरकार येणार : अमित पाटकरांचा दावा

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
4 hours ago
काँग्रेसने गोवा फॉरवर्डच्या प्रस्तावावर तत्काळ निर्णय घ्यावा: विजय सरदेसाई

मडगाव: काँग्रेस हा आमच्या युतीतील महत्त्वाचा घटक आहे. काँग्रेसची निर्णय प्रक्रिया काहीशी संथ असली, तरी गोव्यातील राजकारण मात्र वेगाने बदलत आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाने काँग्रेससमोर काही प्रस्ताव ठेवले आहेत; गोव्याच्या हितासाठी काँग्रेसने त्यावर तत्काळ निर्णय घेऊन पावले उचलावीत, असे आवाहन आमदार विजय सरदेसाई यांनी केले.



फातोर्डा येथे आयोजित कार्निव्हल सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी लंडनचे खासदार किथ वाझ, काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, युवा काँग्रेस अध्यक्ष अर्चित नाईक, दुर्गादास नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. सरदेसाई यांनी सर्व पाहुण्यांचा सत्कार केला. यावेळी ते म्हणाले, दरवर्षी कार्निव्हल अधिक भव्य करण्याचा आमचा प्रयत्न असतो. गोव्याची संस्कृती संरक्षित करून ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे. म्हणूनच स्थानिक बँड आणि पारंपरिक गोमंतकीय खाद्यसंस्कृतीला आम्ही प्राधान्य दिले आहे.



गोव्यातील तरुणांच्या स्थलांतराबाबत चिंता व्यक्त करताना सरदेसाई म्हणाले, अनेक तरुण रोजगारासाठी परदेशात जात आहेत. त्यांना दुहेरी नागरिकत्वाचा हक्क मिळावा यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे. सध्याचे सरकार यात अपयशी ठरत असल्यास, जनतेने गोव्याचे खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व करणाऱ्या सरकारला पाठिंबा द्यावा. आमची युती सत्तेत आल्यास पोर्तुगीज पासपोर्ट असलेल्यांना दुहेरी नागरिकत्व मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यावर्षी गोव्याच्या राजकारणात 'मेक गोवा' किंवा 'ब्रेक गोवा' अशी स्थिती निर्माण होऊ शकते, त्यामुळे काँग्रेसने अधिक वेळ न घालवता आगामी निवडणुकांसाठी सज्ज व्हावे, असा सल्लाही त्यांनी दिला.



दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी आत्मविश्वासाने सांगितले की, गोव्यात कार्निव्हलच्या सुरुवातीनंतर पाच दिवस किंग मोमोची राजवट असते. मात्र, पुढच्या वर्षी काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डचे सरकार सत्तेत येईल, तेव्हा केवळ पाच दिवसच नव्हे, तर वर्षभर गोमंतकीय आनंदाने आणि उत्साहाने राहू शकतील.

हेही वाचा