'ज्युनियर स्टेनो' पदासाठी निवड झालेले उमेदवार दिल्लीतील गोवा सदनात नोकरी करण्यास अनुत्सुक

इच्छुकांसाठी आयोगाकडून अर्ज करण्याची मुदत वाढली.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
'ज्युनियर स्टेनो' पदासाठी निवड झालेले उमेदवार दिल्लीतील गोवा सदनात नोकरी करण्यास अनुत्सुक

पणजी: कर्मचारी भरती आयोगामार्फत ज्युनियर स्टेनोग्राफर पदासाठी निवड झालेले उमेदवार दिल्लीतील गोवा सदनात नोकरी करण्यास अनुत्सुक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यामुळे, दिल्लीत जाण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना आयोगाकडे कळवण्यासाठी दिलेल्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे.

ज्युनियर स्टेनोग्राफर पदासाठी घेतलेल्या संगणक आधारित परीक्षेच्या (CBT) आधारे आयोगाने निवड यादी जाहीर केली आहे. या उमेदवारांची विविध सरकारी खात्यांमध्ये नियुक्ती करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. नवी दिल्ली येथील गोवा सदनातही एका ज्युनियर स्टेनोग्राफरची नियुक्ती करायची असून, निवड झालेल्या उमेदवारांमधूनच ही नेमणूक होणार आहे. यासाठी जे उमेदवार स्वखुशीने दिल्लीत जाण्यास तयार आहेत, त्यांनी १३ फेब्रुवारीपर्यंत आपली संमती कळवावी, अशी सूचना देण्यात आली होती. मात्र, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने ही तारीख आता २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

एलडीसी, ज्युनियर स्टेनोग्राफर आणि अकाऊंटंट यांसारख्या पदांवर निवड झाल्यानंतर त्यांची विविध विभागांत नियुक्ती केली जाते. गोवा सदन, दिल्ली येथेही ज्युनियर स्टेनोग्राफरची आवश्यकता असून, तेथे कोणत्या निकषावर नियुक्ती करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कोणावरही सक्ती न करता, इच्छेनुरूप नियुक्ती करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.

हेही वाचा