श्री मल्लिकार्जुन देवालय श्रीस्थळ, काणकोण

गोमंतकातील देवालये अद् भूत वैशिष्ट्यांमुळे अद्वितीय आहेत. मोठमोठे सम्राट, चक्रवर्ती यांनी बांधलेली देवालये आजही गौरवाने त्या काळाची संस्कृती मिरवत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे काणकोण तालुक्यातील श्रीस्थळ येथील श्री मल्लिकार्जुन देवालय.

Story: देवभूमी गोवा |
14th February, 11:21 pm
श्री मल्लिकार्जुन देवालय श्रीस्थळ, काणकोण

कण्वपुरम वा काणकोण ही कण्वऋषींची तपोभूमी, सर्वशक्तीमान श्री मल्लिकार्जुन देवाची जन्मभूमी आहे. हा सौदर्यसृष्टीने नटलेला, अडवट प्रांत, निसर्गरम्य प्रदेश आहे. श्री मल्लिकार्जुन मूळ मंदिराची वास्तू हब्बू ब्राह्मणांनी उभारली. मंदिराच्या जीर्णोद्धाराचा प्रारंभ शके १७०० म्हणजे इ.स. १७७८ या वर्षी विलभी नाम संवत्सरी या वर्षी झाला. मंदिर बांधून पूर्ण होण्यास बराच कालावधी लागला असावा, असा निष्कर्ष देवालयाच्या दप्तरांतील जीर्णोद्धारासंबंधीच्या कागदपत्रांवरून निघतो.

आख्यायिका

श्रीस्थळ जेथे वसले आहे, त्या जागी प्राचीन काळी जंगल होते. त्या जागेत मानवीवस्ती वसवण्यासाठी जंगलातील झाडे तोडण्याचे काम हाती घेण्यात आले. कुऱ्हाड, कोयता अशा हत्यारांनी झाडे कापणे सुरू होते. एका वेळीप ज्ञातीचा मजूर झाड तोडत असताना त्याच्या हातातील कोयता हातातून निसटून खाली पडला. झाडाखाली असलेल्या दगडावर तो कोयता पडला. त्याबरोबर त्या दगडातून एका बाजूने रक्ताच्या आणि दुसऱ्या बाजूने दुधाच्या धारा निघाल्या. त्या वेळीपाला काहीच समजेना. तो घाबरून थरथर कापू लागला. त्याने आपल्या डोक्यावरील वस्त्र काढून त्या दगडाला घट्ट बांधले. त्याबरोबर रक्ताचे आणि दुधाचे प्रवाह थांबले. त्या वेळीपने त्या दगडाला देव मानून भक्तिभावाने घरून जेवणासाठी आणलेला उकड्या तांदळाचा भात नैवेद्य म्हणून अर्पण केला. त्याच्या भक्तीवर प्रसन्न झालेले देव रात्री वेळीपच्या स्वप्नात आले आणि आपण संतुष्ट असल्याचे सांगितले. त्या वेळीप भाविकाने त्या लिंगरूपी पाषाण दगडास देव मानले. स्नान झाल्यावर तो त्या लिंगास स्वच्छ पाण्याने धुवून, पसून गंध, अक्षता, फुले वाहून, आरती करून नैवेद्य दाखवत असे.

पूजा-अर्चा करण्याचा मान वेळीप कुटुंबाकडे

परिसरातील जंगलतोड पूर्ण झाल्यावर लिंगरूपी श्री मल्लिकार्जुन देवासाठी देवालय बांधण्यात आले. देवालयाची जबाबदारी तेथे वसाहत करून राहिलेल्या लोकांनी स्वीकारली. देवाची पूजा-अर्चा करण्याचा अधिकार व मान त्या वेळीप भाविकाकडे दिला. तेव्हापासून तो मान वेळीप कुटुंबाकडेच परंपरेने चालत आलेला आहे. कालांतराने वेगवेगळ्या संस्थानांची राज्ये आली, तशी देवालयाची व्यवस्था पाहण्यासाठी नियम बदलत गेले. त्या काळातही देवाची दैनंदिन पूजा-अर्चा त्या वेळीप कुटुंबाकडेच राहिली. आताही वेळीप कुटुंबातीलच एक व्यक्ती वर्षातील फाल्गुन वद्य चतुर्थी ते वैशाख अमावास्या या काळात देवाची सेवा करत आहे. इतर दिवशी पूजा-अर्चा करण्यासाठी वैदिक ब्राह्मण भटजी देवस्थानाने नेमला आहे.

देवस्थानचे वांगडी

श्री मल्लिकार्जुन देवस्थानचे वांगडी हे ‘भावपुतभाव’ म्हणून ओळखले जातात. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. १. म्हाल वांगड, २. उत्तर नायक वांगड, ३. आलबानायक वांगड, ४. मदनिया वांगड, ५ मूळनायक वांगड, ६. नुयनायक वांगड, ७. मूकनायक वांगड, ८. तेलकनायक वांगड, ९. केशिया वांगड, १०. नागफळ वांगड.

वीरामेळ

वीरामेळ फाल्गुन शुद्ध द्वादशीच्या रात्री होतो. नगर्से येथील शिरेवाड्याहून दिवसभर उपाशी असलेले तीन गडे अंगाला गंध लेपून नंग्या तलवारी घेऊन निघतात. वीरामेळ निघण्यापूर्वी कोहळा (कुंवाळे) कापण्याचा विधी शिरेवाडा व चार मार्ग यांच्यामध्ये शेतांतून गेलेल्या नाल्यावर (होळी) होतो. कोहळा कापल्यावर त्याचे दोन्ही भाग पूर्ववत सांधले जाणे आवश्यक असते. ते सांधले गेले नाही तर वीरामेळ यशस्वी होत नाही, अशी समजूत आहे. वीरामेळांना जाघांटिच्या वाद्याची साथ असते. अंधाऱ्या रात्री हे नंग्या तलवरी धारण केलेले वीर अंगात अवसर आलेल्या अवस्त ‘सू ऽऽऽ सूऽऽऽ’ असा आवाज करत वेगाने धावत सुटतात. त्यांच्याबरोबर तीर्थ कलश घेतलेले भगत असतात. वीर घरोघर फिरतात, तेव्हा कलशामध्ये पानाचा विडा घालायचा असतो. विडा घालण्यास उशीर झाला, तर गडे अंगावर तलवारीचे वार करून अंगणात लोळण घेतात. अंगणात गडे पडणे दुःचिन्ह मानतात. गडे अंगणात आले असताना त्या घरात रजस्वला स्त्रीने राहू नये, असे बंधन आहे. उण्यापुऱ्या पाऊण तासाच्या आत वीरामेळाचे गडे गावात संचार करून शिरेवाड्यावर परत येऊन निपचित पडतात. वीरामेळाचे दृश्य भीती निर्माण करणारे, असे रूद्रभयानक असते. रात्रीचा अंधार आणि जघाटीचा धीरगंभीर ध्वनीमुळे वातावरण अतिशय तंग झालेले असते. वीरामेळ दोन वर्षांतून एकदा असतो.

मंदिरातील इतर परिवार देव

श्री मल्लिकार्जुन देवस्थानच्या परिसरात एकूण ६८ परिवार देव अथवा पुरव आहेत. मंदिराच्या आत शिवलिंगाच्या डाव्या बाजूला श्री गणपतीची मूर्ती आहे. शिवलिंगासमोर नंदिकेश्वर व देवाच्या पादुका आहेत. कुलकेश्वराचे लिंग अग्रशाळेच्या दक्षिण बाजूस आहे. निराकराचे देऊळ डाव्या बाजूस आहे.

इतर देव : १. भूमीपुरुष, २. रामचंद्र पुरुष, ३. बालीजण, ४. श्री परशुराम, ५. पार्वतीची अथवा देवीची घुमटी मंदिरासमोरच्या टेकडीच्या पायथ्याशी, ६. जाणा देव, ७. पाचा पुरुष, ८. कुल पुरुष, ९. प्रभावळ पुरुष, १०. श्री रामनाथ, ११. मालीपूर्व शासनी, १२. तोरण पायक, १३. वाघ्रो, १४. जठी, १५. मारांगणाचे स्थान. याशिवाय इतर ४३ लिंगे श्रीस्थळात ठिकठिकाणी आहेत. घोड्यांपायक श्रीस्थळाच्या वाटेवर मध्येच लागतो. भविक लोक त्याच्या नावे झाडाची डहाळी तोडून टाकल्यावाचून पुढे जात नाहीत. उत्तरेस हासाळी अथवा आसाळी येथे कारेपायकाचे देऊळ आहे. खालवडे, किंदळे आणि नगर्से येथे श्री निराकाराचे मठ आहेत. आदिनाथाचा मठही किंदळेलाच आहे. खालवडेस दक्षिण बाजूस घराताराचा मठ आहे. ते त्याचे मूळ स्थान होय. उत्तरेस सोमनाथ व त्याचे परिवार देव आहेत. आगोंद गावच्या सीमेवर ‘आगोंदा’ आहे, तर सीमेचे रक्षण भूमीपुरुष करतो. पश्चिमेस पाळोळे येथे समुद्रकिनारी शिवोरसो असून, पूर्व सीमेवर अर्धफोंड येथे ‘नास’ संचार करत आहे.

शिसारान्नी उत्सव

श्री मल्लिकार्जुन देवाचे वर्षभर विविध सण साजरे होतात. त्यात फाल्गुन शुद्ध षष्ठीचा सण उत्साहात साजरा होतो. एका वर्षी ‘वीरामेळ’, तर दुसऱ्या वर्षी ‘शिसारान्नी’ साजरे केले जातात. या दोन्ही उत्सवांची महतीच वेगळी. अवतारोत्सव, दिवजोत्सव व षष्ठी जत्रोत्सव हे तिन्ही महत्त्वाचे सण. एका वर्षी ‘वीरामेळ’ झाला तर दुसऱ्या वर्षी ‘शिसारान्नी’ अथवा ‘शीर्षकाराधन’ उत्सव फाल्गुन षष्ठीस श्रीस्थळ येथे होतो. ‘वीरामेळा’प्रमाणे ‘शिसारान्नी’चा विधीही धीरगंभीर आणि भीतीदायक असतो.

या विधीला दुपारी प्रारंभ होतो. सर्व सहा तरंगे, गडे राजांगणात आणून उभी करण्यात येतात. त्यावेळी आश्चर्य म्हणजे शिसारान्नीचा विधी पार पडेपर्यंत तरंगे कशाचाही आधार नसताना उभी राहतात. शिसारान्नीच्या विधीत भाग घेणारे गडे आणि भगत शुचिर्भूत होऊन प्रथम देवळात जमा होतात. दहा वांगडी आणि महाजन यांची उपस्थिती असते. शिसारान्नीचा विधी निर्विघ्नपणे पार पडावा म्हणून देवाला गाऱ्हाणे घालण्यात येते. गड्यांना राजांगणात शिसारान्नीच्या ठिकाणी घेऊन येतात. त्यानंतर तीन ढोल, जघांटा वादक, गड्यांच्या दंडात दाभणे टोचून जमिनीवर चुलीच्या आकारात झोपण्यात येते. मानवी डोक्यांच्या चुलीवर मडके ठेवून खाली शिसवीची लाकडे पेटवून भात शिजविण्यात येतो. याप्रसंगी तीन भगत तलवारी घेऊन उभे असतात. ते आपल्या अंगावर तलवारीचे वार करतात. यावेळी त्यांच्या अंगात अवसर आलेला असतो. त्याचप्रमाणे आधार नसताना उभी असलेल्या तरंगाच्या गड्यांच्या अंगात बसल्या ठिकाणी अवसर यायला लागतो. हा प्रसंग अंगावर शहारे आणतो. मग एक भगत वीरासन घालून खाली बसतो. दुसरा भगत त्याच्या मस्तकावर एका हाताने तलवार धरून दुसऱ्या हाताने तलवारीवर दंडुक्याचा प्रहार करतो. वीरासन घातलेल्या भगताच्या डोक्यातून रक्त निघताच ते शिसारान्नीवर शिजवलेल्या भातात मिसळून तो भात मग आजूबाजूस शिंपडतात. यावेळी अवतीभवती जमलेल्या लोकांत एखादी भूतपिशाच्चची बाधा झालेली व्यक्ती असेल, तर तिच्यावर भाताचे कण (शिते) पडल्यास ती ताबडतोब घुमू लागते. शिसारान्नीचा विधी समाप्त होईस्तोवर तरंगे आपोआप उभी असतात. मग गडे ती आपल्या हाती घेतात. कौलप्रसादाचा विधी होतो. शिसारान्नी ज्यावर्षी होतात, त्यावर्षी भूतबाधा झालेल्या लोकांना श्रीस्थळ येथे आणले जाते. शिसारान्नी शिजलेल्या भाताची शिते त्यांच्या अंगावर पडताच भुते पळून जातात, अशी समजूत आहे. हे कौल मध्यरात्रीपर्यंत चालते. नंतर राजांगणातून गडे देवालयाच्या चौकटीवर जाऊन महाजनांना कौल व सांगणी करून विसर्जन होतात. पेनोटीमध्ये गावपणाने, बोळ्येकारासह प्रत्येकाचा योग्य मान करून जमलेल्यांना केळ्यांचा प्रसाद वाटून जत्रेची सांगता होते. पुढे रात्री कोंबडे व बकरे मारून खेत्रविधी होतो. त्यानंतर महाजनांना त्याठिकाणी रात्र घालवणी व राहणे मनाई आहे. अशारितीने हा षष्ठी जत्रोत्सव साजरा होतो. मानवी मनातील सुप्त श्रद्धेचे, निःस्वार्थ भक्तीचे व भयांकुळपण दृढ आत्मविश्वासाचे उदाहरण म्हणजे काणकोण श्रीस्थळचा हा सण. काणकोणवासी तो पुरेपूर जगतात. 

वर्षभरात होणारे उत्सव

चैत्र : वर्ष प्रतिपदा, वसंत पूजा चैत्र पौर्णिपासून वैशाख पौर्णिमेपर्यत.

आषाढ : वेळीप समाजाकडून श्री मल्लिकार्जुनचा वर्धापनदिन. आषाढ शुद्ध अष्टमीपासून अमावास्येपर्यंत अखंड भजनी सप्ताह.

श्रावण : प्रतिपदा ते सप्तमीपर्यंत महारूद्रानुष्ठान, गोकुळाष्टमी.

भाद्रपद : चतुर्थी, पंचमी. गणपती विसर्जनानंतर मौन व्रताने जोगवण घातली जाते.

आश्विन : नवरात्र रोज दुपारी अभिषेक, रात्री कीर्तन, दसरा, कोजागिरी पौर्णिमा, पार्वती देवीचा वर्धापनदिन, आश्विन पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत पहाटे काकड आरती.

कार्तिक : तुलसी विवाह, दहिकाला, कार्तिक वद्य प्रतिपदा पहाटे पालखीतून देवाची मिरवणूक, काला, हरिजागर, आवाळी भोजन, रात्री शंखासुर काला,

मार्गशीर्ष : दत्तजयंतीनिमित्त रात्री महापूजा.

पौष : पौर्णिमा. वेळीप समाजाकडून महापूजा, अवतार व कौल.

माघ : पंचमी ते नवमीपर्यंत रथसप्तमी, अष्टमी, नवमी. वांगड्यांकडून पुण्याह वाचन, रात्री नाटक, पहाटे देवाची रथातून मिरवणूक. महाशिवरात्री दिवसभर महाभिषेक, रात्री देवाला अंबारीत बसवून हत्तीवरून मिरवणूक, दुसऱ्या दिवशी पहाटे समुद्रस्नान.

फाल्गुन : पौर्णिमा, चतुर्थीला महाभिषेक, पंचमीला पहाटे दिवजांची जत्रा, तरंगाच्या भोवऱ्या, रात्री पालखी, सुवारीवादन, गुलालोत्सव. षष्टी : सकाळपासून तरंगाच्या भोवऱ्या, सायंकाळी अवतार, शिसारान्नी, कौल.

ऐतिहासिक शमीपत्र :  श्रीस्थळच्या श्री मल्लिकार्जुन देवस्थानात विजयादशमीला सीमोल्लंघन प्रसंगी पुरातन काळापासून ‘शमीपत्र’ नावाचा लेख दरवर्षी वाचला जातो. श्री मल्लिकार्जुन देवालयाचा जीर्णोद्धार शके १७०० विलंबी नाम सवंत्सरात करण्यात आला असून त्यासंबधीचा एक अस्सल शिलालेख सदर देवालयाच्या घुमटीवर उपलब्ध आहे. मात्र शमीपत्राच्या मूळ वृक्षाची पाळेमुळे प्राचीनतेच्या दृष्टीने नेमकी किती खोलवर रुजली आहेत, याची नोंद सापडत नाही. श्रीस्थळच्या देवस्थानात उपलब्ध असलेल्या शमीपत्रात वाराणसी, उज्जैनी, द्वारका, विद्यानगर, दौलताबाद, अहमदनगर, दिल्ली, श्रीरंगपट्टण आदी ऐतिहासिक महत्त्वाच्या नगरांचा स्पष्ट उल्लेख आहे. त्याचबरोबर काणकोण नावाच्या सदंर्भात कण्वपूरम, क्रौंचक्षेत्र, कौंचपूर आणि अडवट या प्राचीन नावांचा नामनिर्देश आहे.     

अशोककुमार उत्तम देसाई
पणसुले, काणकोण

हेही वाचा