साप्ताहिकी - या आठवड्यात घडलेल्या ठळक घडामोडी

चिंबलवासीयांच्या आंदोलनाची यशस्वी सांगता, मिराबाग-सावर्डेतील बंधाऱ्याला स्थानिकांचा विरोध

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
14th February, 08:13 pm
साप्ताहिकी - या आठवड्यात घडलेल्या ठळक घडामोडी

पणजी : युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभ यांना विरोध करण्यासाठी सुरू केलेले चिंबलवासीयांचे आंदोलन अखेर यशस्वी झाले. तर, मिराबाग-सावर्डे येथील जुवारी नदीवर प्रस्तावित बंधाऱ्याच्या कामाला स्थानिकांनी तीव्र विरोध करून काम बंद पाडले. नेसाय आयडीसीतील फॅक्टरीला भीषण आग याशिवाय अपघात, नागरिकांची फसवणूक, चोरी अशा घटना घडल्या. या आठवड्यातील घडामोडींचा घेतलेला आढावा.

रविवार

ट्रकच्या चाकाखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू

राष्ट्रीय महामार्ग १७-बी वर बिट्स पिलानी गोवा कॅम्पसच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर भीषण अपघात घडला. वेर्णा औद्योगिक वसाहतीत कामावर जात असताना एका दुचाकीस्वाराला ट्रकने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. प्रवीण शिरोलकर (३२) असे या मृत तरुणाचे नाव आहे.

सांताक्रूझ ग्रामसभेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

सांताक्रूझ पंचायतीच्या ग्रामसभेत आपले म्हणणे मांडण्यासाठी उभे राहिलेले ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिक ओलावियो फर्नांडिस यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी फर्नांडिस यांना बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात (गोमेकॉ) नेले. मात्र, दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.

पिळर्ण येथे १५.८९ लाखांचे कोकेन जप्त

गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने पिळर्ण - बार्देश येथे छापा टाकून १५.८९ लाख रुपये किमतीचे कोकेन जप्त केले. या प्रकरणी ओमेरिगो फ्रायडे (४२) या नायजेरियन नागरिकाला अटक केली. त्याला म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयाने सात दिवस पोलीस कोठडी ठोठावली आहे.

सोमवार


चिंबलवासीयांचे आंदोलन अखेर यशस्वी

युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभ यांना विरोध करण्यासाठी सुरू केलेले चिंबलवासीयांचे आंदोलन अखेर ४४ व्या दिवशी यशस्वी झाले. प्रशासनाने दोन्ही प्रकल्प स्थलांतरित केल्याचे लेखी आदेश काढल्यानंतर आंदोलकांनी एकमेकांना पेढे भरवून विजय साजरा केला.

रस्त्यात कार उभी केल्यावरून म्हापशात पोलिसालाच अरेरावी

रस्त्यावर मध्येच चालती कार उभी केल्याच्या क्षुल्लक कारणावरून आयआरबी पोलीस कॉन्स्टेबलला जाब विचारत त्याच्या गाडीची चावी काढून धिंगाणा घालणाऱ्या दोड्डा, हासन-कर्नाटक येथील पाच पर्यटकांना म्हापसा पोलिसांनी प्रतिबंधक कारवाईखाली अटक केली आहे.

मंगळवार


मिराबाग येथे बंधारा प्रकल्पाविरोधात धरणे

मिराबाग-सावर्डे येथे जुवारी नदीवर बंधारा प्रकल्प उभारण्यास स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे. काही दिवसांपासून स्थानिक या प्रकल्पाविरोधात आंदोलन करत आहेत. मंगळवारपासून स्थानिकांनी धरणे आंदोलन सुरू केले. प्रकल्प रद्द होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

कोलवा पोलीस निरीक्षकांची राखीव दलात बदली

कोलवा पोलीस निरीक्षकांनी पोलीस फौजफाट्यासह स्थानिक चर्चच्या धर्मगुरूंची भेट घेतल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी कोलवा पोलीस ठाण्यावर धडक दिली. ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षकांच्या बदलीची आणि जाहीर माफीची मागणी लावून धरली. पोलीस अधीक्षक संतोष देसाई यांनी दिलेल्या आश्वासनानंतर निरीक्षकांची बदली राखीव दलात करण्यात आली आहे.

दीपनगर-कुर्टीच्या एमआरएफ शेडमधील कचऱ्याला आग

दीपनगर-कुर्टीच्या एमआरएफ शेडमधील कचऱ्याला आग लागली. फोंडा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविली. सरपंच नावेद तहसीलदार यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. आग लागण्याचे कारण स्पष्ट झाले नसले तरी परिसरातील कचऱ्याला लावलेली आग शेडमध्ये पोहचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

बुधवार


लैंगिक अत्याचार प्रकरणातून बाबूश यांची सुटका

मेरशी येथील विशेष न्यायालयाने पणजीचे आमदार तथा महसूलमंत्री बाबूश मॉन्सेरात यांच्यासह रोझी फेरोस यांना २०१६ मधील लैंगिक अत्याचार प्रकरणातून पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. याबाबतचा आदेश न्या. ईर्शाद आगा यांनी दिला. पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार ४ मे २०१६ रोजी दाखल झाली होती.

रुमडामळ भागात गॅस वाहिनीतून गळती

रुमडामळ हाउसिंग बोर्ड भागात मारुती मंदिराच्या मागील बाजूला बुधवारी सकाळी नॅचरल गॅस वाहिनीतून गळती झाल्याने आग लागण्याची घटना घडली. मडगाव अग्निशामक दलाने पाण्याचा मारा करत या आगीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर संंबंधित एजन्सीने दुरुस्तीही केली.

दारूच्या नशेत विदेशी महिलेवर हल्लाप्रकरणी युवकाला अटक

दारूच्या नशेत व्हॅल अगोंद येथे ६६ वर्षीय झेक नागरिक महिलेवर हल्ला केल्याप्रकरणी काणकोण पोलिसांनी बुधवारी केपे तालुक्यातील बेंदुर्डे येथील २२ वर्षीय तरुणाला अटक केली. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता.

गुरुवार

लुथरा बंधूंचा जामीन अर्ज म्हापसा सत्र न्यायालयाने फेटाळला

हडफडे येथील बर्च क्लब आग दुर्घटना प्रकरणातील संशयित आरोपी क्लबचे मालक लुथरा बंधूंचा जामीन अर्ज म्हापसा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश द्विजपल पाटकर यांनी फेटाळून लावला आहे.

शिवोली येथे स्वयंअपघातात नेपाळी युवकाचा मृत्यू

सोनारखेड, मार्ना शिवोली येथे झालेल्या स्वयंअपघात बिबेक चौधरी (२२, रा. मार्ना, शिवोली व मूळ नेपाळ) या युवकाचा मृत्यू झाला. तर, पवन चौधरी (२४) व सागर चौधरी (३२) हे दोघे जखमी झाले असून हणजूण पोलिसांनी अपघातास कारणीभूत दुचाकी चालक सागरविरुद्ध विनावाहन परवाना गाडी चालवणे आणि सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.

शुक्रवार

ज्येष्ठ नागरिकाला १२.०४ लाखांचा गंडा

शेअर ट्रेडिंगमध्ये जास्त मोबदला देण्याचे आमिष दाखवून बार्देश तालुक्यातील एक ज्येष्ठ नागरिकाला १२.०४ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला होता. या प्रकरणी सायबर विभागाने अज्ञात मोबाईलधारकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दयानंद नार्वेकरांसह पत्नीची निर्दोष मुक्तता

मुलगा गणेशराज नार्वेकर याच्या बनावट जन्म दाखला खटल्यातून गोवा क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष तथा माजी उपमुख्यमंत्री अॅड. दयानंद नार्वेकर व त्यांची पत्नी सुषमा नार्वेकर यांची म्हापसा प्रथमश्रेणी न्यायालयाने निर्दोष सुटका केली.

वाहनाला आग लागून एक लाखाचे नुकसान

बाणावलीतील झुडिओ शोरुमच्या समोरील वेस्टर्न बायपासवर टाटा झेनॉन या मालवाहतूक करणाऱ्या वाहनाला अचानक आग लागली. मडगाव अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण आणत दोन लाखांची मालमत्ता वाचवली तर एक लाखाचे नुकसान झाले.

शनिवार


नेसाय आयडीसीतील फॅक्टरीला भीषण आग

नेसाय सां जुझे दी अरियाल येथील औद्योगिक वसाहतीमधील सीहाथ कॅनिंग कंपनीच्या मासळी प्रक्रिया आणि पॅकिंग फॅक्टरीच्या कोल्ड स्टोअरेजला शनिवारी दुपारी आग लागली. आगीत फॅक्टरीचे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. मडगावसह कुंकळ्ळी व कुडचडे येथील अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण आणण्याचे काम केले.

सांगोल्डात स्वीमिंग पूलमध्ये जखमी युवकाचा मृत्यू

सांगोल्डा येथील एका हॉटेलमधील स्वीमिंग पूलमध्ये उडी घेतल्यानंतर केरळ येथील अजय पुलीक्कल (२३ वर्षे) हा युवक गंभीर जखमी झाला. तेथून त्याला जवळच्या हॉस्प‌िटलमध्ये दाखल करण्यात आले. नंतर गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, याठिकाणी उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले.

लक्षवेधी

गावडोंगरी काणकोण येथील स्टेट बँक ऑफ इंडियाजवळ दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये ठेवलेली, जीए-०३-सी-०१८४ क्रमांकाची मारुती ८०० कार, रविवारी सकाळी बॅटरी शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत जळून खाक झाली. कार दत्ता देसाई यांची होती. गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या इतर पाच गाड्यांना परिसरातील रहिवाशांनी आगीपासून दूर केले,.

गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने पिळर्ण-बार्देश येथे छापा टाकून नायजेरियनाकडून १५.८९ लाख रुपये किमतीचे कोकेन जप्त केले होते. नायजेरियनाला मदत केल्याप्रकरणी तसेच त्याची भाडेकरू पडताळणी न केल्यामुळे गुन्हा शाखेने सुधीर पालयेकर (४२, सांगोल्डा-बार्देश) याला अटक केली. पालयेकर याला म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली.

सरकारी तिजोरीत कराच्या स्वरूपात महसुलाची भर पडावी म्हणून कॅसिनोंना परवानगी देण्यात येत असली तरी सरकारला बऱ्याच कॅसिनोंनी ‘चुना’ लावला आहे. कॅसिनोंकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी असतानाही आता मांडवीत मोठ्या कॅसिनो जहाजाला परवानगी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. उपलब्ध माहितीनुसार, कॅसिनोंनी सरकारला ३१४ कोटी रुपयांचा ‘चुना’ लावला आहे.

आंबेखणवाडो, वेरे बार्देश येथील श्री शांतादुर्गा मंदिरातील फंडपेटी फोडून चोरांनी सुमारे ३० हजारांची रोख रक्कम लंपास केली. मंदिराच्या छताची कौले काढून चोरांनी ही चोरी केली. चोरीचा हा प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये बंदिस्त झाला आहे.

फोंडा येथील शांतीनगर-कुडतरकर नगरी भागातील दर्श शंकरे या तरुणाला ‘बजाज फायनान्स’मध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी २ लाख १० हजार ८०४ रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी फोंडा पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

हेही वाचा