सुमारे दोन लाखांचे नुकसान; मडगाव, कुंकळ्ळी व कुडचडे येथील अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले

मडगाव : नेसाय (सां जुजे दी आरियाल) येथील औद्योगिक वसाहतीमधील 'सीहाथ कॅनिंग कंपनी'च्या मासळी प्रक्रिया आणि पॅकिंग फॅक्टरीच्या कोल्ड स्टोअरेजला शनिवारी दुपारी आग लागली. या आगीत फॅक्टरीचे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. मडगावसह कुंकळ्ळी व कुडचडे येथील अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले.
नेसाय औद्योगिक वसाहतीतील मासळी प्रक्रिया व पॅकिंग फॅक्टरीच्या बाजूला नवीन कोल्ड स्टोअरेजचे बांधकाम सुरू होते. त्या ठिकाणी शनिवारी दुपारी १२:४१ वाजण्याच्या सुमारास आग लागली. या घटनेची माहिती मडगाव अग्निशमन दलाला देण्यात आली. सुरुवातीला औद्योगिक वसाहतीतील पाण्याच्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न झाला, मात्र आगीची तीव्रता जास्त असल्याने तो यशस्वी झाला नाही. घटनेची माहिती मिळताच मडगाव, कुंकळ्ळी आणि कुडचडे येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे अनर्थ टळला आणि आग इतरत्र पसरली नाही.
कोल्ड स्टोअरेजच्या बांधकामावेळी थर्माकोलच्या आत 'ग्लू' लावण्याचे काम सुरू होते. उन्हाच्या तीव्रतेमुळे थर्माकोलने पेट घेतला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. अग्निशमन दलाची गाडी पोहोचण्यासाठी सुमारे एक तासाचा अवधी लागला, तोपर्यंत उपलब्ध साधनसामग्रीने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. या आगीत सुमारे दोन लाखांचे नुकसान झाल्याचे मालक बिस्मिल्ला यांनी सांगितले.
यापूर्वी डिसेंबर २०२५ मध्येही नेसाय आयडीसीमधील 'केम-टेक' फॅक्टरीला आग लागली होती. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे औद्योगिक वसाहतीतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या ठिकाणी पाण्याची पुरेशी सोय नसून रेल्वे गेटवरील उंचीच्या बॅरिअरचा मोठा अडसर निर्माण होत आहे. सरकारने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिक ट्राव्हासो यांनी केली आहे.
रेल्वे गेटवरील बॅरिअरमुळे अग्निशमन दलाला विलंब
नेसाय येथील रेल्वे मार्गावर अवजड वाहनांसाठी उंचीचे बॅरिअर लावण्यात आले आहे. मडगाव अग्निशमन दलाची गाडी तिथे पोहोचल्यानंतर बॅरिअरमुळे पुढे जाऊ शकली नाही. परिणामी, गाडीला सुमारे १० किलोमीटरचा वळसा घालून घटनास्थळी यावे लागले. यामुळेच पोहोचण्यास विलंब झाल्याचे अग्निशमन दलाचे अधिकारी गिल सुझा यांनी स्पष्ट केले.