
पणजीः गोव्यात महात्मा गांधी रोजगार गॅरंटी मिशन (मनरेगा) (MGNREGA) अंतर्गत १४५ रस्ते (Road) प्रकल्प पूर्ण झाले आहेत. १३६ रस्त्यांची कामे सुरू असल्याची माहिती ग्रामीण विकास मंत्रालयाने (Ministry of Rural Development) दिली.
मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालानुसार ग्रामीण भागांत जे अंतर्गत रस्ते आहेत; त्या रस्त्यांची कामे मनरेगाखाली झाली आहेत. पण ग्रामीण भागांत खासकरून आदिवासी भागांत ही कामे हातात घेताना अनेक आव्हाने आल्याने ही कामे पू्र्ण व्हायला उशीर होतो. त्यात डोंगराळ भाग आणि कठीण भौगोलीक परिस्थिती, वन खात्याचा दाखला, स्थानिक पातळीवर बांधकाम साहित्याची मर्यादित उपलब्धता आणि स्थानिक कायदा व सुव्यवस्थेसंबंधी आव्हाने या कारणांचा समावेश आहे.
या कठीण परिस्थितीत रस्त्यांची गुणवत्ता आणि टिकाऊपणाची खात्री करण्यासाठी सर्व रस्ते प्रकल्प इंडियन रोड्स कॉंग्रेसच्या मानांकनानुसार तयार केले आहेत. यात ग्रामीण आणि डोंगरावरील रस्त्यांसाठी विशेष मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश आहे. मंत्रालयाने तीन पातळ्यांवर गुणवत्ता ठरवण्यासाठी यंत्रणा अंमलात आणली आहे.
तसेच रस्ता टिकून राहणार हे निश्चित करण्यासाठी मूळ कंत्राटदाराकडे पाच वर्षांचा सक्तीचा बांधकामानंतरचा देखरेख करार केला आहे. नंतर राज्य सरकारच्या निधीतून देखरेख होते. पारदर्शकता वाढवण्यासाठी मंत्रालय खासदार, आमदार आणि स्थानिक पंचायत प्रतिनिधी यांचा एक गट तयार करून संयुक्त पाहणी घडवून आणते.
वर्ष २०२०-२१ ते २०२५-२६ या दरम्यान १४६ रस्ते प्रकल्प ग्रामीण भागांत पूर्ण झाले. सर्वात जास्त ६९ रस्ते प्रकल्प वर्ष २०२४-२५ मध्ये पू्र्ण झाले तर या आर्थिक वर्षात ८ प्रकल्प पूर्ण झाले.
वर्ष रस्ते प्रकल्प
२०२०-२०२१ ३५.
२०२१-२०२२ २६.
२०२२-२०२३ ५.
२०२३-२०२४ २.
२०२४-२०२५ ६९.
२०२५-२०२६ ८.