नवसाला‌ पावणारी ‌‘देवती’ श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण

श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण देवी कुंभारजुवे ग्रामस्थांची ग्रामदेवी आहे. श्री सातेरी तथा श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण, शांताई व देवती या नावाने भक्तगण तिला संबोधतात. जागृत देवता असल्यामुळे भाविक तिला ‌‘देवते पाव गे‌’ म्हणून हाक मारतात.

Story: देवभूमी गोवा |
14th February, 11:15 pm
नवसाला‌ पावणारी ‌‘देवती’ श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण

पोर्तुगीजांच्या धार्मिक अत्याचाराला कंटाळून भाविकांनी १५३४ ते १५४० या काळात कुंभारजुवे शांतादुर्गा देवीचे ‌‘कुमारसाय‌’ (खोल) हून स्थलांतर करून फोंडा तालुक्यातील वरगावच्या श्रीक्षेत्र माशेल वाड्यावर आणले. श्री रवळनाथ, श्री रामाय-सती व गाढवंस ही अन्य तीन देवस्थाने या मूळ देवस्थानशी संलग्न आहेत.

पंचधातूच्या कलशावर देवीचा मुखवटा 

माशेल येथील श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण देवस्थानाच्या गर्भगृहात श्री शांतादुर्गा देवीची संपूर्ण मूर्ती नसून गर्भगृहात पिंडिकेवर पाण्याने भरलेला पंचधातूचा मोठा मंगल कलश आहे. या कलशाच्या मुखावर श्री शांतादुर्गा देवीचे मोवाळे किंवा कांचोळी (मुखवटा) स्थापन केला आहे. असे देवीचे स्वरूप गोव्यात एकमेव आहे. याच कलशावर कौलासाठी कळी लावली जाते. देवीची नित्यनेमाने पूजा केली जाते. उत्सवाच्या काळात या मंगल कलशाला वस्त्र नेसवून सुवर्ण अलंकाराने सजवितात. देवीचे अस्तित्व शांत असल्याने तिचे ‌‘शांतादुर्गा‌’ असे नामकरण करण्यात आले आहे.

दोन वेळा जीर्णोद्धार

माशेल येथे श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण देवस्थान आज सुंदर व प्रशस्त आहे. दोन वेळा देवस्थानचा जीर्णोद्धार केला गेला. मंदिरातील चौकीची रचना, लाकडी छताची काष्ठ शिल्प, खांब, गर्भकुडीतील चांदीचे मखर व देवीची मूर्ती पाहून भाविक प्रसन्न होतात.

देवस्थानातील प्रमुख उत्सव

देवस्थानात वसंत पूजा, जायांची पूजा, शिखर कलश वर्धापनदिन, गणेश चतुर्थी व सांगडोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा, दीपोत्सव व तुळशीविवाह कालोत्सव, मालिनी पौर्णिमा, होळी, रामायसती वर्धापनदिन, हळदोणे, शिशिरोत्सव तसेच दर पंचमीला पालखी उत्सव साजरे होतात.

पंचमीला पालखी उत्सव

प्रत्येक महिन्याच्या दोन पंचमींना पालखी उत्सव असतो. या उत्सवांत पालखीची सात पेणी (मुक्काम) ठरावीक ठिकाणीच होत असतात. पालखी देवालयाबाहेर निघाल्यानंतर पहिले पेणे महाद्वारातच होते. दुसरे पेणे देवालयासमोरील अश्वत्थ पिंपळ (सध्या अस्तित्वात नाही) त्या पाराकडे, तिसरे पेणे अश्वत्थ पिंपळ पाराच्या अलीकडे हमरस्त्यावर, चवथे पेणे श्री रवळनाथ देवालयासमोर, पाचवे पेणे मुख्य देवालयाच्या उजव्या बाजूस, सहावे पेणे देवालयाच्या डाव्या बाजूकडे पालखी प्रदक्षिणावेळी होते. विहिरीजवळ पालखी पोहोचल्यावर सातवे पेणे करून पालखी देवालयाच्या आवारात महाद्वारापाशी पोहोचते.

पालखीतील देवीला काही पेण्यांवर भाविक मंगलारती ओवाळतात. सेवेकरी जल्मी नारळाने देवीची दृष्ट काढतो. तो नारळ महाद्वाराच्या पायऱ्यांच्या डाव्या बाजूस जमिनीवर फोडला जातो. देवीची पालखी देवालयातील चौकावर स्थानापन्न होते. 

शिशिरोत्सव (शिबिकोत्सव)

कुंभारजुवे गावात पालखी न थांबता दिवस-रात्र घरोघरी फिरण्याची प्रथा आहे. देवी वर्षातून एकदा आपल्या गावी येते. पालखीत बसून ती ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीने संचार करून प्रत्येक घरात सुवासिनींकडून ओटी स्वीकारून नंतर स्वस्थानी मंदिरात जाते. देवीचे आगमन गुढीपाडव्याच्या अगोदर कुंभारजुवेत होते. देवी पालखीत बूसन माशेल, तारीवाडा येथे नदीजवळ येते. परंपरेनुसार परब कुंटुंबीय सजवलेली होडी तयार ठेवतात. पालखी पारंपरिक वाद्यसंगीत, फटाक्यांच्या आतषबाजीत व जयघोष करत माशेल तीरावरून थापणवाडा-कुंभारजुवे तीरावर नदी पार करून येते.

कुंभारजुवेत घरोघरी पोहोचते पालखी

देवीचे थापणवाड्याजवळ आगमन होऊन पालखी पुढे शेतीमार्गे ‘सारंगी आँख’ येथे मूळ स्थानावर वास्तव्य करते. आठ दिवस येथे नाटके होतात. गुढीपाडव्याच्या दिनी दुपारी ४ वाजल्यापासून देवी पालखीत बसून कुंभारजुवे गावात प्रत्येक घरात संचालन करायला सुरुवात करते. गावात भ्रमण करण्यासाठी वीस दिवस लागतात. या काळात देवीचे दररोजचे स्वरूप वेगळे असते. गाव फिरून झाल्यावर देवी ‌‘सारंगी आँख‌’ येथे परत येते. तेथे आरती व पूजा केली जाते. गाऱ्हाण्यांनी सांगता झाल्यावर भाविकांकडून गुलालाची उधळण केली जाते. त्यानंतर देवी पालखीतून मंदिरात परत जाण्यासाठी निघते. यावेळी पालखी जड झाल्याचा अनुभव भाविकांनी घेतला आहे.

माशेल भागातही पालखीचे घरोघरी पूजन

माशेल तारीवाड्यावर देवीचे आगमन झाल्यावर वाटेत पालखी उभे व बसकी संचालन, पूजा-अर्चा व काणूक करीत निघते. माशेल भागात घराघरांत फिरून पालखी देवळाच्या मागील बाजूस चुनेकर कुटुंबीयांच्या घरी प्रवेश करते. चुनेकर यांच्या घरी बसकी काणूक झाल्यानंतर देवीची पालखी मंदिरात प्रवेश करते. मंदिर सभागृहात दारासमोर गुलालाची उधळण होते. जल्मी नारळाने देवीची दृष्ट काढतात. पालखी देवळात विसावते. देवीचा संप्रोक्षण विधी होतो. देवीला अभ्यंगस्नान घातले जाते. नवीन शालू, अत्तर, फुलांनी सजविली जाते. दुसऱ्या दिवशी, चैत्र शुक्ल पंचमीला पालखी उत्सवाचा कार्यक्रम होतो.

गणेश चतुर्थी व सांगोडोत्सव

कुंभारजुवे येथील वाडीये कुटुंबीयांच्या घरी दीड फूट उंचीच्या लाल रंगाच्या श्री गणेशमूर्तीचे पूजन होत असे. त्यावेळी आलेल्या महामारीमुळे वाडीये कुटुंबाने देवीच्या कौलाप्रमाणे मंगलमूर्ती देवस्थानात आणून ठेवली. वाडीये कुटुंबातील ही लाल रंगाची श्री गणेशमूर्ती देवस्थानात ठेवल्यानंतर त्याकाळी देवस्थान कमिटी, महाजन व ग्रामस्थांनी मंगलमूर्तीचे विसर्जन सांगोडात बसवून करायचे ठरवले. गणपती विसर्जनाची अनोखी पद्धत म्हणजे देवीचा ‘सांगोडोत्सव‌’. दोन होडी बांधून त्यावर लाकडी फळीचा टप्पा तयार करणे याला ‘सांगड‌’ म्हणतात. दोन किंवा अधिक होड्या जोडून सजवलेल्या होड्यांतून विविध विषयांवरील देखावे सादर केले जातात. देवस्थानात दीड फूट लाल रंगाच्या श्री गणेशमूर्तीचे सात दिवस पूजन केले जाते. गणेशोत्सवाची सांगता सांगोडोत्सवाने होते.

१९ व्या शतकाच्या सुरुवातीला सांगोडाचे स्वरूप फळ फळाच्या, पानांच्या आधारे सुशोभित असायचे. रामायण, महाभारत, पुराण तसेच इतर विषयांतील आधारित प्रसंगांचे सादरीकरण व्हायचे. बेताळ, अंबा, अंबालिका, शंखासुर आणि पुतना अशा रूपांचे प्रस्तुतीकरण दरवर्षी होते. सांगोडावर मंगलमूर्तीबरोबर भटजी, जल्मी, वाजंत्री, देवस्थान कमिटी सदस्य व होडी नियंत्रण करण्यासाठी नाविक, महाजन व ग्रामस्थ असतात. मंगलमूर्ती असलेला सांगोड सात फेरे पूर्ण केल्यानंतर श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करतात.

नवरात्रोत्सव व मखरोत्सव

देवस्थानातील नवरात्रोत्सव व मखरोत्सव अद्वितीय आहे. नऊ-रात्री नऊ देवीची रूपे, सुशोभित मखरात बसलेली प्रसन्नचित्त देवीची रूपे, पारंपरिक ढोल, ताशे, झांज, शहनाईच्या सुमधुर संगीतावर झुलते. मखर पाहण्यास गर्दी होते. अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून अश्विन शुक्ल नवमीपर्यंत मखरोत्सव साजरा होतो. अश्विन शुक्ल दशमीला दसरा (विजयादशमी) उत्सव सीमोल्लंघन पालखीने होते.

नवरात्रोत्सवात दररोज रात्री ९.३० वाजता मखरोत्सवाला सुरुवात होते. पूर्वी देवी मखरात फक्त घोड्यावर विराजमान असायची. २०२० पासून देवीचा कौल घेऊन विविध आसनांची तयारी केली. आता देवी नऊपैकी सहा रात्री घोडाव्यतिरिक्त सिंह, नंदी, कासव, मयूर, मगर व कमळ यावर आरूढ असते. मखर संचालन चालू असताना पुजारी देवीला आरती दाखवतात. मखर संचालन अर्धा तास चालते. नंतर सामूहिक सांगणे केले जाते. 

विजयादशमीला सीमोल्लंघन

दहाव्या दिवशी म्हणजेच आश्विन शुक्ल दशमीला दसरा (विजयादशमी) साजरा होतो. झेंडूच्या फुलांनी मंदिराची सजावट होते. दुपारी ४ वाजता देवीची पालखी वाजत गाजत देवीचा जयघोष करत वळवई, माशेल, कुंभारजुवा रस्ता जोडणाऱ्या सीमेवर असलेल्या पेडापाशी जाऊन थांबते. तिथे आरती होते. नंतर जवळच असलेल्या आपट्याच्या झाडाची पूजा होते. पुजारी सोने लुटण्याचा इशारा करतात. त्याप्रमाणे भाविक देवीला नमस्कार करून सोने लुटणे, म्हणजेच आपट्याची पाने काढतात व देवीला अर्पण करून आशीर्वाद घेतात. देवीच्या जयघोषात देवीची पालखी परत देवस्थानात येण्यासाठी निघते. पालखी देवस्थानात गर्भगारात स्थानापन्न होते.

कालोत्सव  

मार्गशीर्ष शुद्ध  पंचमीला कालोत्सव साजरा होतो. रात्री १०.३० वाजता देवीची लालखीतून मिरवणूक काढली जाते. परत देवळात आल्यावर देवी सभागृहातील उच्च स्थानावर विराजमान होते. रात्री १२ पासून दशावतारी काला सादरीकरणास सुरुवात होते. पहाटे ३ वाजता दशावतारी काल्याची समाप्ती होते. दुसऱ्या दिवशी दुपारी ३ वाजता गवळण काल्याला सुरुवात होते. गवळण कालाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण झालेले पात्र दहीहंडी फोडून नाट्य संपवतात. गवळण काला संपल्यानंतर उच्च स्थानावर बसलेली देवी पालखीत बसून स्नानासाठी माशेल कुंभारजुवे नदीच्या तीरावर प्रस्थान करते. पालखी माशेल तारिवाड्यावर पोहोचल्यानंतर तेथील वडाच्या खाली पेडावर विसावते. भटजी कलश घेऊन कमिटी सदस्यांसोबत नदीकिनारी जातात. कलशामध्ये नदीचे पाणी भरून भटजी देवीचे चरण धुतात, देवीच्या अंगावर पाणी शिंपडतात आणि डोळ्यांना व देवीच्या मुखाला पाणी लावतात. अशा तऱ्हेने स्नान झाल्यानंतर पालखी मंदिरात येऊन गर्भकुडीत देवी स्थानापन्न होते.

मालिनी पौर्णिमोत्सव

पौष शुक्ल पौर्णिमा किंवा मालिनी पौर्णिमा या दिवशी संध्याकाळी लालखी फुलांनी सजवून तयार केली जाते. रात्री ११ वाजता पूजन करून देवीला लालखीत बसविले जाते. सुवारी वादन व पारंपरिक वाद्यसंगीताबरोबर लालखी मिरवणुकीला सुरुवात होते. ‘शांतादुर्गा माता की जय’चा जयघोष करत लालखीचे संचालन ठरलेल्या वाटेवरून होते. लालखी मंदिराच्या सभागृहात पोहोचल्यावर दारातच नारळाने देवीची दृष्ट काढली जाते. नंतर देवीला आत नेली जाते. 

होळी

देवस्थानात होळीचा उत्सव फाल्गुन वैद्य प्रतिपदेला साजरा करण्याची प्रथा आहे. घरातील नकारात्मक ऊर्जा व शक्तीचा पूर्ण नायनाट व्हावा म्हणून ग्रामस्थ घरातून ओवाळून आणलेला नारळ होळीजवळ फोडतात. होळीचा उत्सव सुपारीच्या झाडांपासून साजरा करतात. सकाळी देवस्थान कमिटी सदस्य, जल्मी, काटकर, महाजन व भाविक तिवरे-वरगाव येथे जाऊन जल्मीच्या मार्गदर्शनाखाली सुपारीची दोन झाडे निवडतात. एक १२ हात लांब, तर दुसरे ८ हात लांब उंचीचे झाड असते. दोन्ही झाडे खांद्यावरून आणली जातात. छोटे झाड मंदिरासमोर ठेवून मोठे झाड खांद्यावर घेऊन भाविक माशेल तीरावर येतात. माशेल तीरावरून मोठे सुपारीचे झाड होडीने आणून कुंभारजुवे गावात तारी, वळवईकर यांच्या घरासमोर ठेवले जाते. त्याला आंब्याची पाने, बांबू बांधून सजवले जाते. अशाप्रकारे होळी तयार केली जाते. होळीची पूजा-अर्चा करून मिरवणूक काढली जाते. मिरवणूक राम देवस्थान जवळून पुढे सरकत ताकवाडा मार्गे मुख्य रस्त्यावर येते. मुखाने होळी सवंगडी ‘केळीच्या घणसो’ व ‘ओस्सय’ ‘ओस्सय’ असे म्हणत पुढे चालतात. रस्त्यात घराघरांतील भाविक होळीची अगरबत्तीने ओवाळणी करून फुले वाहतात. गावात ‘सारंगी आँख’ येथे होळी ठेवली जाते. होळीला बांबूपासून त्रिकोणी आकाराची आरास बांधली जाते. आंब्याची पाने, केळीचा घड, फुले वगैरे बांधून होळी सजवितात. ‘सारंगी आँख’ येथे एका बाजूला होळी उभी करण्यासाठी मोठा खड्डा तयार केलेला असतो. मोठ्या खड्ड्यामध्ये होळी उभी करतात. त्याच्या मुळात छोटे-मोठे दगड टाकून होळी तटस्थ-घट्ट उभी केली जाते. होळीची पूजा, आरती झाल्यानंतर होळीच्या जवळ गवत व सुकी शेणाची पेण टाकून आग लावली जाते. मग जल्मी मुख्य होळीजवळ गाऱ्हाणे घालतो. जल्मी गाऱ्हाणे घालण्यास सुरू करतो. त्याच्या बाजूला भाविक डाव्या हातात तांदूळ घेऊन उजव्या हाताने गाऱ्हाण्यावर मुखाने ‘हय सायबा’, ‘हय सायबा’ म्हणून होकार देतात. उपस्थितांकडून होळीवर तांदळाचा छिडकाव केला जातो. होळीच्या पायथ्याशी नारळ फोडून होळीला एक प्रदक्षिणा घालून ग्रामस्थ घरी येतात.

जायांची पूजा

दरवर्षी श्रावणी पौर्णिमेला जायांची पूजेचा उत्सव थाटात साजरा केला जातो. सकाळी पूजेनंतर देवीला जायांच्या फुलांनी सजविले जाते. देवीला सुंदर शालू व सोन्याच्या अलंकाराने सजवतात. त्यानंतर जायाच्या फुलांनी सुशोभित करतात. संध्याकाळी कीर्तनाचा कार्यक्रम झाल्यानंतर आरती, आशीर्वाद व तीर्थप्रसाद झाल्यानंतर उत्सवाची सांगता होते.

शिखर कलश व पिंडीका वर्धापन दिवस

या उत्सवाची सुरुवात २०१२ साली तिसऱ्या जीर्णोद्धारापासून श्रावण वद्य तृतीयेला झाली. सकाळी ८ वाजल्यापासून देवस्थानात सग्रह नवचंडी व रवळनाथ देवालयात लघुरुद्र होतो. रात्री ८ वाजता पालखी मिरवणूक होते. पालखी मंदिरात परतल्यानंतर आरती, आशीर्वाद, पावणी व तीर्थप्रसाद होऊन उत्सवाची सांगता होते.

रामायसती वर्धापन दिवस

श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण देवस्थानाच्या पंचायतन देवतांपैकी श्री रामायसती देवस्थान, कुंभारजुवे गावात-वाडा येथे स्थित आहे. या देवस्थानाचा वर्धापन दिन फाल्गुन कृष्ण षष्ठीला साजरा होतो. सकाळी धार्मिक विधी होतात. संध्याकाळी ७ वाजता भजन, आरती व तीर्थप्रसाद होऊन वर्धापन दिनाची सांगता होते.

दीपोत्सव व तुळशी विवाह

कार्तिक शुद्ध पौर्णिमेला सकाळचे नियमित विधी, झाल्यानंतर समईची पूजा करून दीपोत्सवाची सुरुवात होते. भाविकांच्या सहभागातून देवळात असंख्य तुपाचे दिवे प्रज्वलित करण्याचा कार्यक्रम रात्री ८ वाजेपर्यंत चालतो. ८ वाजता सुखासन (देवीचे विशेष आसन) असते. सुखासन मिरवणूक झाल्यानंतर आशीर्वाद व तीर्थप्रसाद होतो. रात्री देवळासमोरील तुळशी वृंदावनात तुळशी विवाह कार्यक्रम होतो.

सुखासन 

वर्षाला तीन सुखासन मिरवणुका असतात. कार्तिक शुद्ध प्रतिपदा, कार्तिक पौर्णिमा व मार्गशीष वद्य द्वितीया या दिवशी सुखासन मिरवणूक होतात. फुलांनी सजवलेल्या सुखासनात देवीला बसवून पारंपरिक वाद्य संगीतासोबत वाजत-गाजत मिरवणूक होते.

वसंतपूजा 

वैशाख शुद्ध तृतीया (अक्षयतृतीया) या दिवशी मंदिरात वसंतपूजा होते. सकाळी पूजा-अर्चा होते. संध्याकाळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम होतो. रात्री ८ वाजता पालखी मिरवणूक निघते. पालखी मंदिरात पोहोचल्यावर देवी गर्भगृहात विराजमान होते. वसंत पूजेच्या दिवशी प्रसाद वाटप करण्यासाठी रानमेवांचे आयोजन करतात. या रानमेव्यात उसळ, अननस, करम, पन्ने, काण्णा, जांभळे, आंबे, घोटा, फणसाचे गरे, भिण्णाचं सरबत आणि पंचखाद्य असते. प्रसाद वाटून झाल्यानंतर उत्सवाची सांगता होते.

आवळी पूजन

वैकुंठ चर्तुदशीला आवळी पूजनाचा कार्यक्रम होतो. सकाळी देवी पालखीतून तुळशी वृंदावनातील आवळीच्या झाडाकडे आसनस्थ होते. तेथे आवळी पूजनाचा कार्यक्रम होतो. त्याठिकाणी धात्री (आवळी) सह विष्णू व देवीची पूजा हवन करून नंतर देवीला नैवेद्य दाखवला जातो. संध्याकाळी पालखी प्रदक्षिणेने देवळात आल्यावर आरती व तीर्थप्रसादाने उत्सवाची सांगता होते. 

डॉ. शिवाजी मुकुंद शेट 
ज्येष्ठ संशोधन अभ्यासक, अष्टपैलू कलाकार व अध्यक्ष 

हेही वाचा