चिनी कंपनीला १३ कोटींचा गंडा घातल्याचे प्रकरण : 'बँक ट्रेल'च्या विश्लेषणातून एकंदरीत निधीचे लेयरिंग आणि डायव्हर्जन उघड.

पणजी: लोहखनिजाच्या खाणीतून खोऱ्याने पैसा ओढण्याचे स्वप्न दाखवून परदेशी कंपन्यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या 'जिवा माइन्स अँड मिनरल्स लिमिटेड'चा जीव आता ईडीच्या विळख्यात अडकला आहे. गोव्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOC) सुरू केलेल्या तपासाची सूत्रे हाती घेत, ईडीच्या पणजी विभागीय कार्यालयाने या प्रकरणातील सुमारे २ कोटी २९ लाख रुपयांच्या तीन स्थावर मालमत्तांवर तात्पुरती जप्ती आणली आहे. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या (PMLA) बडग्याखाली ही कारवाई करण्यात आली असून, यात संशयितांनी चिनी कंपनीची तब्बल १३.४२ कोटींची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.
या प्रकरणाची कथा एखाद्या 'क्राईम थ्रिलर' सिनेमाला शोभावी अशीच आहे. २०१० मध्ये 'जिवा माइन्स'च्या मालकांनी चीन स्थित 'मेसर्स लाओ टिंग दादी मोबाईल कंपोनंट्स' नावाच्या कंपनीला खाण कामात भागीदारी करण्याचे आमिष दाखवले. आपल्याकडे खाणींचे मालकी हक्क आहेत आणि आपण लोहखनिजाची मोठी निर्यात करू शकतो, अशा आश्वासनांच्या जोरावर त्यांनी या कंपनीला भुरळ घातली. या भुलथापांना बळी पडून, संबंधित कंपनीने सुमारे २.९५ दशलक्ष डॉलर्स (साधारण १३.४२ कोटी रुपये) या 'जिवा'च्या स्वाधीन केले.
मात्र, पैसे हातात पडताच खाणकामाचे आणि निर्यातीचे स्वप्न हवेत विरले. प्रत्यक्षात ना जमिनीखाली उत्खनन झाले, ना बंदरावरून जहाजे सुटली! पैसे गेले कुठे? तर ईडीच्या तपासातून असे समोर आले आहे की, हा सर्व पैसा संशयितांनी अतिशय पद्धतशीरपणे स्वतःच्या सुखसोयींसाठी आणि मालमत्ता खरेदी करण्यासाठी वळवला. 'बँक ट्रेल'च्या विश्लेषणातून या निधीचे लेयरिंग आणि डायव्हर्जन उघड झाले असून, ज्या पैशातून खाणीत डंपर फिरायला हवे होते, त्या पैशातून आरोपींनी मुंबई आणि सिंधुदुर्गात आपल्या नावे जमिनी घेतल्या.
ईडीने जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील गालेल येथील दोन जमिनींचे भूखंड आणि मुंबईतील अंधेरी (पश्चिम) येथील एका आलिशान निवासी फ्लॅटचा समावेश आहे. या मालमत्ता 'गुन्ह्यातून मिळालेल्या उत्पन्ना'तून (Proceeds of Crime) खरेदी केल्या गेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गोव्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने यापूर्वीच फसवणूकीचा गुन्हा नोंदवून आरोपपत्र दाखल केले होते, ज्याचा आधार घेत ईडीने आता ही मालमत्तेच्या तात्पुरत्या जप्तीची कारवाई केली आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.