पणजी येथे कार्निव्हल उत्साहात

पणजी : गोवा हे पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध होत असताना आम्ही सांस्कृतिक पर्यटनाला प्रोत्साहन देत आहोत. गोवा हे पर्यटनस्थळ म्हणून अधिक विकसित करण्यासाठी कार्निव्हलचा मोठा वाटा आहे. पुढील आठ दिवस पर्यटक आणि गोवेकरांनी कार्निव्हलमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
पणजी येथे शनिवारी कार्निव्हल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पारंपरिक वेशात सजलेले किंग मोमो सेड्रिक दा कोस्टा हे कार्निव्हलचे प्रमुख आकर्षण होते. त्यांनी कार्निव्हलचा जाहीरनामा वाचून दाखवल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. हा उत्सव सर्वांनी उत्साहाने, एकोप्याने आणि शिस्तबद्धपणे साजरा करावा, असे आवाहन किंग मोमो यांनी केले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते कार्निव्हलच्या मिरवणुकीला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. यावेळी पर्यटन मंत्री रोहन खंवटे, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष केदार नाईक, तसेच पर्यटन खात्याचे संचालक आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
राज्यातील तसेच देश-विदेशातील पर्यटक दरवर्षी कार्निव्हल साजरा करण्यासाठी पणजी येथे येतात, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आम्ही सांस्कृतिक पर्यटनाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देत आहोत. गोवा हे पर्यटन राज्य असल्यामुळे कार्निव्हल, शिमगो, चिखल कालो यांसारख्या विविध सांस्कृतिक महोत्सवांना चालना दिली जाते. गोवा पर्यटनस्थळ म्हणून अधिक प्रगत होण्यासाठी कार्निव्हलची महत्त्वाची भूमिका आहे. किंग मोमो पुढील आठ दिवस गोव्यातील विविध भागांत कार्निव्हल मोठ्या प्रमाणात साजरा करतील आणि सर्व गोवेकर त्यात सहभागी होतील, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
अशा उपक्रमांमुळे पर्यटनाला चालना : खंवटे
गेल्या चार वर्षांपासून कार्निव्हलचे मुख्य आकर्षण म्हणून ही परंपरा कायम ठेवण्यात आली आहे. मुख्यमंत्री यांच्या सहकार्याने आम्ही ही परंपरा जपली असून अशा उपक्रमांमुळे पर्यटनाला चालना मिळत आहे. देशी आणि विदेशी पर्यटक जेव्हा गोव्यात येतात तेव्हा त्यांना आमची सांस्कृतिक बाजू पाहायची असते. समुद्रकिनाऱ्यांपलीकडील गोव्याचे वेगळेपण अनुभवायचे असते. त्यामुळे मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विविध महोत्सव आयोजित करीत आहोत, असे रोहन खंवटे यांनी स्पष्ट केले.