विरोधक केवळ टीकेचे राजकारण करत आहेत : महापौर रोहित मोन्सेरात

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
14th February, 04:18 pm
विरोधक केवळ टीकेचे राजकारण करत आहेत : महापौर रोहित मोन्सेरात

पणजी : यंदाच्या महानगरपालिकेच्या कार्यकाळात आम्ही अनेक विकासकामे केली आहेत. यापूर्वीच्या कोणत्याही मंडळापेक्षा आमच्या कार्यकाळात अधिक कामे झाली आहेत. त्यामुळे विरोधकांना निवडणुकीसाठी कोणताही ठोस मुद्दा सापडत नाही. म्हणूनच ते शेवटच्या दहा दिवसांत सक्रिय होऊन केवळ वैयक्तिक टीकेचे राजकारण करत आहेत, अशी प्रतिक्रिया महापौर रोहित मोन्सेरात यांनी दिली. शनिवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

रोहित मोन्सेरात म्हणाले की, पावसाळ्यात पणजीत उद्भवणारी पुरस्थिती रोखणे अशक्य मानले जात होते, मात्र आम्ही गेल्या तीन वर्षांपासून ही स्थिती यशस्वीपणे नियंत्रणात आणली आहे. आमच्या या कार्याची दखल घेऊन राष्ट्रपतींच्या हस्ते पालिकेचा गौरवही करण्यात आला. दुसरीकडे, गेल्या पाच वर्षांत विरोधकांनी काहीही केले नाही, ते शांत बसून होते. आता निवडणुका आल्यावर त्यांना जाग आली असून, ते लोकांना भावनिक करून मते मागत आहेत. आम्ही यापूर्वीही रस्त्यावर उतरून कामे केली आहेत आणि यापुढेही करत राहू.

निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांची यादी तयार आहे. यंदा आम्ही नवीन उमेदवारांना निवडणूक लढवण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. मतदारसंघांच्या आरक्षणाचा विचार करून नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल. ही नावे लवकरच जाहीर करण्यात येतील. आचारसंहिता लागू झाल्यानंतर अधिकृत प्रचार सुरू होईल, मात्र तोपर्यंत शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वाल्मिकी नाईक यांनी ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक केली

कॅसिनोबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना महापौर म्हणाले की, कॅसिनोला माझा वैयक्तिक विरोध आहेच, मात्र यामुळे स्थानिकांना रोजगार आणि व्यवसाय मिळत आहे. विरोधकांनी केवळ विरोध करण्यापेक्षा रोजगाराचा पर्यायी मार्ग सुचवावा. तसेच, १२ फेब्रुवारी रोजी महापालिकेची बैठक होणार नसल्याचे आधीच कळवले होते, तरीही वाल्मिकी नाईक यांनी ज्येष्ठ नागरिकांना फसवून महापालिकेत आणले, असा आरोपही रोहित मोन्सेरात यांनी यावेळी केला.

हेही वाचा