
पेडणे : बंगळुरू येथील एका रुग्णालयात कार्यरत असलेले के. कांताराज (वय ४५) हे आपल्या दोन मित्रांसोबत पर्यटनासाठी गोव्यात आले होते. दरम्यान, मोरजी येथील टेंबवाडा समुद्रकिनारी समुद्रस्नानासाठी गेले असता कांताराज याचा बुडून मृत्यू झाला.
समुद्रात पोहत असताना तिघेही पाण्याच्या खोल भागात अडकले. यावेळी के. कांताराज यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मात्र, घटनास्थळी तैनात असलेल्या जीवनरक्षकांनी तत्काळ धाव घेत उर्वरित दोघांना सुरक्षित बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले.
या घटनेनंतर कांताराज यांचा मृतदेह पुढील तपासणी व शवचिकित्सेसाठी गोवा मेडिकल कॉलेज बांबोळी येथे पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.