मुरगाव पालिकेकडून तक्रार दाखल

वास्को : येथे सील करण्यात आलेल्या जिमचे कुलूप काढून तेथे नवे कुलूप लावणाऱ्या जीम मालकाविरोधात मुरगाव पालिकेने वास्को पोलीस स्थानकात तक्रार केली आहे. तसेच त्या जिमला पुन्हा सील करण्यात आले. या जीमप्रकरणी नगरविकास संचालनालयात सुनावणी सुरू आहे.
शहर भागात असलेल्या एका इमारतीमध्ये एका व्यक्तीने भाडेपट्टीवर फ्लॅट घेऊन तेथे जीम सुरू केली होती. तथापि, जिममुळे त्या इमारतीतील रहिवाशांना त्रास होऊ लागला होता. सदर जीम सकाळी सहा वाजता सुरू होत असे, त्यानंतर दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत खुली असे. त्यामुळे तेथे व्यायामासाठी वापरण्यात येणाऱ्या सामग्रीच्या आवाजामुळे रहिवाशांना ध्वनी प्रदूषणाला सामोरे जावे लागत होते. तसेच सदर वजनदार सामग्री जमिनीवर ठेवताना इमारतीला हादरे बसत होते. याप्रकरणी रहिवाशांनी मुरगाव पालिकेकडे तक्रारी केल्या होत्या. रहिवाशी इमारतीमध्ये सदर जीम उघडण्यास परवानगी कशी मिळाली यासंबंधी रहिवाशी आश्र्चर्य व्यक्त करीत होते. याप्रकरणी दखल घेताना मुख्याधिकारी नाईक यांनी सदर जिमला टाळे ठोकण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर सदर प्रकरण नगरविकास संचालनालयासमोर गेले. तेथे सुनावणी सुरू असतानाच संबंधित जीम मालकाने मुरगाव पालिकेची परवानगी न घेता ते कुलूप काढून आपले कुलूप लावले. तेथे पुन्हा जीम सुरू झाल्याने रहिवाशांनी आश्चर्य व्यक्त केले. याप्रकरणी मुरगाव पालिकेला माहिती मिळताच त्या जिमला पुन्हा सील ठोकण्यात आले.