
म्हापसा : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) (NCERT), नवी दिल्ली यांच्या वतीने नव्याने विकसित करण्यात आलेल्या तिसरी ते पाचवीच्या (तयारीचा टप्पा) पाठ्यपुस्तकांवर आधारीत मध्य प्रदेश येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण शिबिरात गोव्यातील निवडक शिक्षकांनी भाग घेतला.
भोपाळ, मध्य प्रदेश येथे १० ते १३ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या या शिबिरात गोवा (Goa), महाराष्ट्र (Maharashtra), गुजरात (Gujarat), मध्य प्रदेश, छत्तीसगड तसेच दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव या राज्य व केंद्रशासित प्रदेशातील निवडक शिक्षकांनी सहभाग नोंदवला.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (NCF-SE) यांच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने हे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरले. बालकांच्या संज्ञानात्मक, भावनिक, सामाजिक व सर्जनशील विकासाला चालना देणाऱ्या अनुभवाधारित व कृतीआधारित अध्यापन पद्धती नव्या पाठ्यपुस्तकांत कशा प्रकारे अंतर्भूत करण्यात आल्या आहेत, याबाबत या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले.
गोवा राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून संकेत नाईक (सरकारी प्राथमिक शाळा, साळ, डिचोली), राजेश हरमलकर (स्वरगंधा प्राथमिक शाळा, मांद्रे), रुचिता परब-पिसुर्लेकर (अवर लेडी ऑफ ग्रेस प्राथमिक शाळा, डिचोली), प्रार्थना पालयेकर (श्री महालसा नारायणी विद्यालय, वेर्णा) तसेच रेशा शेट्ये (प्रभोधन प्राथमिक विद्यालय, पर्वरी) या शिक्षकांनी या राष्ट्रीय प्रशिक्षणात सहभाग घेतला.
विविध भौगोलिक व सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या शाळांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या शिक्षकांनी गोव्यातील शैक्षणिक वास्तव, स्थानिक संदर्भ, बहुभाषिक वर्गरचना व अध्यापनातील अनुभव राष्ट्रीय पातळीवर प्रभावीपणे मांडले. इतर राज्यांतील शिक्षकांशी अनुभवांची देवाणघेवाण होताना गोव्याच्या शैक्षणिक पद्धतींचे विशेष कौतुक करण्यात आले.
प्रशिक्षणादरम्यान नव्या पाठ्यपुस्तकांची रचना, अध्यायांची मांडणी, शिकण्याच्या उद्दिष्टांशी सुसंगत कृती, मूल्यांकन पद्धती तसेच विद्यार्थ्यांच्या नैसर्गिक कुतूहलाला चालना देणाऱ्या उपक्रमांवर भर देण्यात आला. विशेषतः ‘गणिती जादू’, विणा -हिन्दी, आपले अद्भूत जग, संतुर-इंग्रजी, खेल-योग या अध्यापन साहित्याचा प्रभावी वापर करून वर्गातील शिकवणी कशी अधिक आनंददायी व अर्थपूर्ण करता येईल, याचे प्रात्यक्षिक सत्र घेण्यात आले. गट चर्चा, सादरीकरण व अनुभव वाटपाच्या माध्यमातून शिक्षकांचा सक्रीय सहभाग दिसून आला.
गोव्यातील शिक्षकांनी या प्रशिक्षणात सक्रिय व सहविचारक म्हणून भूमिका बजावली. स्थानिक पर्यावरणाशी निगडित उदाहरणे, लोककला व स्थानिक संस्कृतीचा अभ्यासक्रमात समावेश; याबाबत त्यांनी सूचना मांडल्या. कावी कला, फुगडी या सारख्या गोव्यातील लोककलेवर आधारित प्रात्यक्षिके व मार्गदर्शन या प्रशिक्षणाचा विशेष आकर्षणाचा भाग ठरला.
प्रशिक्षणातून मिळालेला अनुभव गोव्यातील प्राथमिक शाळांमध्ये प्रत्यक्ष अंमलात आणून विद्यार्थ्यांचे शिकणे अधिक आनंददायी, समावेशक व गुणवत्तापूर्ण करण्याचा निर्धार शिक्षकांनी व्यक्त केला.
गोव्यासारख्या छोट्या राज्यातील शिक्षकांना राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करण्याची संधी दिल्याबद्दल गोवा राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे प्रशिक्षणार्थ्यांनी आभार व्यक्त केले. सदर राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन प्रा. संध्या सांगाई, कार्यक्रम सह-समन्वयक, प्रा. ए. के. राजपूत, कार्यक्रम समन्वयक, डॉ. संदीप कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.