बंगळुरू एटीएम व्हॅन चोरी प्रकरण : १३२८ पानांच्या आरोपपत्रातून धक्कादायक माहिती उघड. वाचा

पणजी: नशिबाची साथ आणि खिशात गरम नोटा असल्या की अनेकांना गोव्याचे आणि तिथल्या झगमगत्या नाईटलाईफ आणि कॅसिनोचे वेध आपसूकच लागतात. मात्र, कष्ट करून पैसे कमावण्याऐवजी चक्क ७ कोटींवर दरोडा टाकून गोव्यात पैसे उधळण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका टोळीचा 'कॅसिनो प्लॅन' पुरता फसला आहे. बंगळूरुमधील गाजलेल्या एटीएम व्हॅन दरोड्याप्रकरणी पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या १३२८ पानांच्या आरोपपत्रातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
गेल्या वर्षी १९ नोव्हेंबर रोजी भरदिवसा रिझर्व्ह बँकेचे अधिकारी असल्याचे भासवून या टोळीने 'सीएमएस इन्फो सिस्टिम्स'ची रोख रकमेने भरलेली गाडी अडवली आणि ७.११ कोटी रुपये लंपास केले. या गुन्ह्याचा मास्टरमाइंड झेवियर हा त्याच कंपनीचा माजी कर्मचारी होता. त्याला कंपनीच्या पैशांच्या हालचालींची खडान् खडा माहिती होती. पण हा दरोडा केवळ कर्जाचा डोंगर उपसण्यासाठी नव्हता, तर त्यामागे 'जीवाचा गोवा' करण्याचा अतरंगी मनसुबा होता.
आरोपपत्रात नमूद केल्यानुसार, दरोडा टाकल्यानंतर या नऊ जणांच्या टोळीने पळून जाण्यासाठी एक मोठा 'रोड मॅप' तयार केला होता. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन कर्नाटक सोडून आंध्र प्रदेशात शिरायचे, तिथून उत्तर प्रदेशमार्गे किंवा थेट गोव्यात पोहोचायचे, असा त्यांचा प्लॅन होता. या टोळीतील काहींनी यापूर्वी जुगारात मोठे पैसे गमावले होते. त्यामुळे 'ज्या हाताने गेले, त्याच हाताने परत मिळवू' या थाटात कॅसिनोमध्ये मोठी उधळपट्टी करून आपले जुने तोटे भरून काढण्याचे त्यांचे दिवास्वप्न होते. त्यांना वाटले होते की, कोट्यवधींच्या रोख रकमेसह गोव्यात पोहोचलो की तिथल्या गर्दीत आणि कॅसिनोच्या झगमगाटात आपण सहज मिसळून जाऊ आणि कुणाला संशयही येणार नाही.

मात्र, या टोळीचा आत्मविश्वासच त्यांना नडला. दरोड्यासाठी वापरलेल्या गाडीवर त्यांनी चक्क एका ७८ वर्षीय आजोबांच्या कारचा नंबर वापरला होता, याचा तपास पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने केला. विशेष म्हणजे, या टोळीला एक पोलीस कॉन्स्टेबलही 'नैतिक' आणि तांत्रिक पाठबळ देत होता, पण त्याचा गणवेशही या दरोडेखोरांना वाचवू शकला नाही. बंगळूरु पोलिसांनी अवघ्या ५४ तासांत या टोळीचा पाठलाग करून त्यांना जेरबंद केले.

पोलिसांनी हस्तगत केलेले ऑडिओ रेकॉर्ड्स, सीसीटीव्ही फुटेज आणि डिजिटल पुराव्यांमुळे आता या नऊ जणांची गोव्याची वारी कायमचीच रद्द झाली असून, आरोपपत्रातील १३०० पाने त्यांच्या भविष्यातील कैदेची गाथा सांगण्यासाठी पुरेशी ठरली आहेत.