लिंकवर क्लिक करणे पडले महागात

पणजी: सध्याच्या सायबर युगात डिजिटल व्यवहार जेवढे सोपे झाले आहेत, तेवढेच ते धोकादायकही ठरू लागले आहेत. दक्षिण गोव्यातील चिखली येथे एका ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला सायबर चोरट्याने सव्वा लाख रुपयांहून अधिक रकमेला लुटल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. जोसेफ मारियो लोपेस असे या फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव असून, एका सुपरमार्केटचा प्रतिनिधी असल्याचे भासवून चोरट्याने त्यांना आपल्या जाळ्यात ओढले.
मिळालेल्या माहितीनुसार, सायबर भामट्याने लोपेस यांच्याशी संपर्क साधून आपण एका नामवंत सुपरमार्केटमधून बोलत असल्याचे भासवले. सांगितलेले काम केल्यास तुमचे बँकिंग व्यवहार अधिक सोपे आणि जलद होतील, असे आमिष दाखवून चोरट्याने त्यांना एका लिंकवर क्लिक करण्यास प्रवृत्त केले. ही लिंक प्रत्यक्षात फसवणुकीचा सापळा होती. कॉल करणाऱ्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून लोपेस यांनी आपल्या क्रेडिट कार्डची अत्यंत गोपनीय माहिती शेअर केली. माहिती मिळताच, काही क्षणांतच सायबर चोरट्याने त्यांच्या बँक खात्यातून १,५०,२९९ रुपये लंपास केले. खात्यातून पैसे डेबिट झाल्याचा संदेश मिळताच आपली फसवणूक झाल्याचे लोपेस यांच्या लक्षात आले आणि त्यांनी तत्काळ पोलिसांत धाव घेतली.
वास्को पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१९(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. तसेच, वास्कोतील मुंडवेल येथेही महादेव ताडेल नावाच्या व्यक्तीला बँक अधिकारी असल्याचे भासवून एका भामट्याने २.३० लाख रुपयांना लुटल्याची दुसरी घटना उघडकीस आली आहे. उपअधीक्षक गुरुदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक वैभव नाईक एनच्या नेतृत्त्वाखाली पोलीस उपनिरीक्षक निखिल देसाई या प्रकरणांचा सखोल तपास करत आहेत. डिजिटल युगात ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करण्याचे प्रमाण वाढत असल्याने, अनोळखी लिंकवर क्लिक न करण्याचे आणि बँक तपशील कोणाशीही शेअर न करण्याचे कळकळीचे आवाहन पोलिसांनी केले आहे.