मोपा विमानतळावरील ‘गोवा स्ट्रीट रेस’ला जल्लोषात सुरुवात

दोन अपघातांनी स्पर्धेला काहीसे गालबोट

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
14th February, 11:32 pm
मोपा विमानतळावरील ‘गोवा स्ट्रीट रेस’ला जल्लोषात सुरुवात

पेडणे : तालुक्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळ येथे सरकारतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘गोवा स्ट्रीट रेस’ या चित्तथरारक स्पर्धेला शनिवारी पहिल्याच दिवशी दुपारी जल्लोषात सुरुवात झाली. मात्र, दोन अपघातांच्या घटनांमुळे या स्पर्धेला काहीसे गालबोट लागले.

या थरारक कार रेसिंग स्पर्धेदरम्यान तीन गाड्या अपघातग्रस्त झाल्या. पहिल्या घटनेत एका कारने समोरील कारला धडक दिल्याने अपघात झाला. तर, दुसऱ्या घटनेत पुढील कारला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दोन गाड्या एकमेकांना धडकल्या. या घटनांमुळे विमानतळावर प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या कार रेसिंग स्पर्धेवर थोडीशी नाराजी व्यक्त होत असल्याचे बोलले जात आहे.

अपघातानंतर मदत पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि अपघातग्रस्त गाड्या क्रेनच्या साहाय्याने बाजूला हलवण्यात आल्या. सुदैवाने या दोन्ही अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही.

स्पर्धेदरम्यान वेगवान कार रेसिंगमुळे निर्माण झालेला थरार आणि उत्साह कायम असतानाच मोटारसायकलस्वारांनी केलेल्या कसरतींनी उपस्थित प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. त्यामुळे काही अपघातांच्या छायेतही स्पर्धेचा उत्साह अबाधित राहिला.

हेही वाचा