रानडुकराने सोलले अंगणात ठेवलेले नारळ

मुळगावात बिबट्यासह आता रानडुकरांचाही वावर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
15th February, 10:15 pm
रानडुकराने सोलले अंगणात ठेवलेले नारळ

डिचोली : गावकरवाडा-मुळगाव येथे मागील वर्षी एका बिबट्याला जेरबंद करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही परिसरात वारंवार बिबट्यांचे दर्शन होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सद्यस्थितीत रात्रीच्या वेळी महिला व लहान मुले बाहेर पडताना घाबरत असल्याचे चित्र आहे.

हल्लीच एका घराच्या मागील बाजूस बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर वनविभागाने त्या ठिकाणी पिंजरा लावला होता. आता मात्र बिबट्याबरोबरच रानडुकरांचाही वावर वाढल्याचे दिसून येत आहे.

रविवारी पहाटे येथील सुनील राऊत यांच्या अंगणात रानडुक्कर नारळ सोलताना दिसला. शनिवारी पहाटेही दोन-तीन नारळ सोललेले आढळले होते. रविवारी सकाळी साडे सहा वाजता घरातील ज्येष्ठ महिलेला दारातच रानडुक्कर दिसल्याने तिची भीतीने गाळण उडाली. या डुकराने अर्धवट सोलून ठेवलेला नारळ दारातच ठेवून धूम ठोकली.

गावातील नागरिकांचे म्हणणे आहे की, डोंगरमाथ्यावर पूर्वी दाट जंगल होते. मात्र, सध्या खाण व्यवसायामुळे मोठ्या प्रमाणावर जंगलतोड झाली आहे. त्यामुळे वन्यप्राणी अन्न व निवाऱ्याच्या शोधात मानवी वस्तीत येऊ लागले आहेत. परिसरात साळींदर, रानमांजर तसेच काही वेळा मगरींचाही सर्रास वावर आढळतो; परंतु आता बिबटे व रानडुकरांसारखे धोकादायक प्राणी वारंवार दिसू लागल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

वनविभाग व संबंधित प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून अशा रानटी प्राण्यांच्या वावरावर नियंत्रण आणावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा