ज्येष्ठ पत्रकार पॉल कार्व्हालो यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी कारचालकास जामीन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
ज्येष्ठ पत्रकार पॉल कार्व्हालो यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी कारचालकास जामीन

सांगे : कुडचडे येथील ज्येष्ठ पत्रकार पॉल कार्व्हालो (वय ६०) यांच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या प्रकरणात फोंडा येथील डब्ल्यू.आर.डी. खात्यात कार्यरत संशयित अभियंता एकनाथ गावडे (वय ४३, रा. केरी-फोंडा) याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला मडगाव येथील सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जामिनावर त्याची सुटका केली.

ही घटना बुधवारी दुपारी घडली. पॉल कार्व्हालो हे आपल्या जी.ए.-०२ एस ५०१० (प्लेजर) या दुचाकीवरून घरी जात असताना त्यांच्या मागील दिशेने वेगात येणाऱ्या टोयोटा जी.ए.-०५ एफ ३४४९ या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका तीव्र होता की कार्व्हालो सुमारे दहा मीटर दूर फेकले गेले. अपघातात त्यांच्या डोक्यावरील हेल्मेटही दूर जाऊन पडले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

अपघातानंतर जखमी अवस्थेत त्यांना प्रथम कुडचडे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी मडगाव येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. प्रकृती अधिक गंभीर झाल्याने त्यांना बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना दोन दिवसांनी, शुक्रवारी दुपारी त्यांचे निधन झाले.

अपघाताच्या वेळी चारचाकी वाहन संशयित अभियंता एकनाथ गावडे चालवत होते. पोलीस तपासात ते दारूच्या नशेत वाहन चालवत असल्याचे निष्पन्न झाले. एका अन्य वाहनाला ओव्हरटेक करताना त्यांनी वाहनावरील नियंत्रण गमावले आणि पॉल कार्व्हालो यांच्या दुचाकीला धडक दिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

या प्रकरणी कुडचडे पोलिसांनी एकनाथ गावडे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १०५, २८१, १२५(डी) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८५ अन्वये गुन्हा नोंदवून अटक केली होती. दरम्यान, प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना मडगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

त्यांनी मडगाव सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जामिनावर त्यांची सुटका केली.

दरम्यान, या घटनेमुळे पत्रकारिता क्षेत्रात तीव्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून पॉल कार्व्हालो यांच्या निधनाने कुडचडे परिसरात शोककळा पसरली आहे.

हेही वाचा