बर्च अग्नितांडव प्रकरण; बिजय कुमार सिंगचा जामीन फेटाळला

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
बर्च अग्नितांडव प्रकरण; बिजय कुमार सिंगचा जामीन फेटाळला

म्हापसा : बर्च बाय रोमिओ लेन क्लब आग दुर्घटना प्रकरणातील संशयित आरोपी क्लबचा ऑपरेशनल मॅनेजर बिजय कुमार सिंग यांचा जामीन अर्ज म्हापसा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. क्लबचे लेनचे सहमालक अजय गुप्ता यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी न्यायालयाने २६ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली आहे.
म्हापसा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश द्विजपल पाटकर यांनी सोमवारी संशयित बिजय कुमार सिंग याच्या जामीन अर्जावर निवाडा जाहीर करत हा अर्ज फेटाळण्यात आला. बिजय कुमार सिंग हा रोमियो लेनच्या दुर्घटनाग्रस्त बर्च क्लबचा ऑपरेशनल मॅनेजर म्हणून काम पाहत होता. दुर्घटनेनंतर संशयित आरोपीने गोेव्यातून आपल्या झारखंड येथे मूळ गावी पलायन केले होते. संशयिताने आपली आई आजारी असल्याने गोव्यातून आपल्याला जावे लागले होते. नंतर तिचा आजारपणाने मृत्यू झाला होता. त्यामुळे आपल्याला गोव्यात परतणे शक्य नव्हते, असा दावा करत त्याने न्यायालयाकडे जामीन मंजूर करण्याची विनंती केली होती. परंतु सरकारी पक्षाने या जामिनाला अर्जाला जोरदार विरोध केला होता.
दरम्यान, संशयिताला हणजूण पोलिसांनी ९ जानेवारी रोजी झारखंडमधून अटक करून गोव्यात आणले होते. नंतर बिजय कुमार सिंगने १३ जानेवारी रोजी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. दुसरीकडे संशयित आरोपी बर्चचे सहमालक अजय गुप्ता यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली असून, २६ फेब्रुवारी रोजी ही सुनावणी संशयित पक्षाच्या युक्तिवादासाठी निश्चित करण्यात आली आहे.

हेही वाचा