गोव्यात १७ टक्के मृत्यू हृदयविकारामुळे : डॉ. पिंटो

तरुणांमधील वाढते प्रमाण : कर्करोगाच्या ३० टक्के प्रकरणांना धूम्रपान कारणीभूत

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
34 mins ago
गोव्यात १७ टक्के मृत्यू हृदयविकारामुळे : डॉ. पिंटो

पणजी : गोव्यातील एकूण मृत्यूंपैकी सुमारे १७ टक्के मृत्यू हे हृदयविकाराच्या झटक्यामुळे होत असल्याचे समोर आले आहे. राज्यात मृत्यू होण्यामागे हे सर्वात मोठे कारण ठरले असून, गेल्या १० वर्षांच्या काळात तरुणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे, अशी माहिती गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या (जीएमसी) पॅथॉलॉजी विभागाचे माजी प्रमुख डॉ. रॉक वायझमेन पिंटो यांनी दिली. ‘क्लब टेनिस डी गॅस्पर डायस’च्या शताब्दी वर्षाानिमित्त आयोजित ‘लाईव्ह्स जर्नी- द लोंग हॉल’ या परिसंवादात ते बोलत होते.डॉ. पिंटो यांनी वैद्यकीय नोंदी, शवविच्छेदन अहवाल आणि पॅथॉलॉजी निष्कर्षांचा सखोल अभ्यास करून हे विश्लेषण मांडले आहे. ते म्हणाले की, गोव्यात मृत्यूचे सर्वात सामान्य कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे स्पष्ट झाले आहे. पूर्वी हा आजार साधारणपणे ६० वर्षांवरील व्यक्तींमध्ये आढळायचा, मात्र आता धावपळीच्या जीवनशैलीमुळे तरुणांनाही याचा मोठा फटका बसत आहे. तरुणांमध्ये मायोकार्डियल इन्फेक्शन (हृदयविकाराचा झटका), अरिदमिया (हृदयाच्या ठोक्यांमधील अनियमितता) आणि हार्ट फेल्युअर हृदय निकामी होणे यांसारखे आजार आता तरुणांमध्ये वाढत आहेत.
डॉक्टरांचा सल्ला घ्या : आरोग्य टिकवण्यासाठी नियमित वैद्यकीय तपासणी करणे आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणे अत्यंत गरजेचे आहे. बाह्य सौंदर्यापेक्षा अंतर्गत आरोग्यावर लक्ष देणे आणि वेळेत वैद्यकीय सल्ला घेणे हाच सुरक्षित राहण्याचा उत्तम मार्ग असल्याचे डॉ. पिंटो यांनी स्पष्ट केले.
हृदयविकाराचा धोका वाढवणारे घटक
- धूम्रपान करणे, मद्यपान आणि अमली पदार्थांचे सेवन.
- उच्च रक्तदाब आणि मधुमेह.
- शरीराला बाहेरून सुदृढ दाखवण्यासाठी घेतलेली स्टिरॉइड्स किंवा हार्मोन्स आरोग्यासाठी गंभीर ठरू शकतात.
धूम्रपानामुळे कर्करोगाचा वाढता विळखा
हृदयविकारासोबतच डॉ. पिंटो यांनी कर्करोगाच्या वाढत्या धोक्यावरही प्रकाश टाकला. त्यांच्या मते कर्करोगाच्या एकूण प्रकरणांपैकी ३० टक्के प्रकरणांचा थेट संबंध प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष धूम्रपानाशी आहे. दिल्लीतील वायू प्रदूषण आणि गोव्यातील खाणकाम तसेच औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणामुळे कर्करोगाचा धोका वाढत आहे. मानसिक ताणतणाव, मद्यपान आणि घातक रसायनांच्या संपर्कामुळे मानवी आरोग्य धोक्यात आले आहे.