सर्वपक्षीयांचा पाठिंबा : दबाव टाळण्यासाठी विलंबाने होणार उमेदवारांची घोषणा

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : महापालिका निवडणुकीत मंत्री बाबूश मॉन्सेरात आणि उत्पल पर्रीकर हांच्या पॅनलमध्ये थेट लढत होण्याची शक्यता आहे. महापौर रोहित मॉन्सेरात यांचा पराभव करून पणजीवासीयांना चांगल्या सुविधा देण्याच्या उद्देशाने ‘आमी पणजेकार’ पॅनलचे उमेदवार निश्चित केले जातील. सर्व विचारसरणीच्या लोकांचा आमच्या पॅनलला पाठिंबा मिळेल, असा विश्वास उत्पल पर्रीकर यांनी व्यक्त केला.
पणजीत बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत उत्पल पर्रीकर यांनी ‘आमी पणजेकार’ पॅनलची घोषणा केली. यावेळी माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो, वैदेही नाईक, दत्तप्रसाद नाईक आणि मिनीन डिक्रूझ उपस्थित होते. महापौर रोहित मॉन्सेरात यांच्या कारभाराला पणजीवासीय कंटाळले आहेत. मंत्री बाबूश मॉन्सेरात यांच्या एकाधिकारशाहीतून पणजीवासीयांची मुक्तता झाली पाहिजे. पणजीतील मूलभूत समस्यांवर उपाय योजून चांगल्या सुविधा देण्यासाठी ‘आमी पणजेकार’ पॅनल निवडणूक लढवणार आहे, असेही उत्पल पर्रीकर यांनी सांगितले.
‘आमी पणजेकार’ पॅनलच्या बॅनरचे यावेळी अनावरण झाले. मॉन्सेरात विरोधकांचा पाठिंबा आम्हाला मिळेल. काँग्रेससह सर्व राजकीय पक्षांचा पाठिंबा आम्ही स्वीकारू. माजी नगरसेवक मिनीन डिक्रूझ काँग्रेसमध्ये आहेत. ते आमच्या पॅनलमध्ये अाहेत. माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांची विचारसरणी वेगळी आहे. तेही आमच्या पॅनलसोबत आहेत, असे पर्रीकर म्हणाले.
आमच्या पॅनलचे उमेदवार सर्व प्रभागांत असतील. काही प्रभागांत मॉन्सेरात पॅनलच्या विरोधी उमेदवाराला पाठिंबा दिला जाईल. उमेदवारांची नावे निश्चित आहेत; मात्र रणनीती म्हणून आम्ही ती गुप्त ठेवली आहेत. नावे जाहीर झाल्यास उमेदवारांवर दडपण येण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून योग्य वेळी नावे जाहीर करू, असे उत्पल पर्रीकर यांनी सांगितले.
महत्त्वाच्या विषयांवर उत्पल पर्रीकर म्हणाले...
कॅसिनोंवर नियंत्रण ठेवण्यासाठी कायद्यानुसार कार्यवाही केली जाईल. कॅसिनोकडून येणाऱ्या महसुलाचा वापर योग्य तऱ्हेने केला जाईल. कॅसिनो बंद करणे वा हटवण्याचे अधिकार महापालिकेला आहेत का, हे पाहूनच निर्णय घेऊ.
स्मार्ट सिटीची कामे दर्जेदार झाली पाहिजेत.
पणजीत पार्किंगची, प्रदूषणाची मोठी समस्या आहे. त्यावर उपाय योजून पणजीवासीयांना चांगल्या सुविधा दिल्या जातील.
माझे वडील स्व. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना मला महामंडळाचे अध्यक्षपद वा अन्य महत्त्वाचे पद सहज मिळू शकले असते. मात्र वडिलांनी माझी नियुक्ती केली नाही. माझी स्वतंत्र ओळख आहे.
विधानसभा लढवण्याचा निर्णय योग्य वेळी घेऊ. प्रचाराला कमी वेळ मिळाला होता, तरीही मला चांगली मते मिळाली.
सर्व पक्षांच्या लोकांच्या पाठिंब्यामुळे महापालिकेवर ‘आमी पणजेकार’ पॅनलचीच सत्ता येईल.
स्व. मनोहर पर्रीकर माझे मित्र : फुर्तादो
माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्याशी माझे राजकीय मतभेद होते. तरीही त्यांच्याशी माझे मित्रत्वाचे नाते होते. मी महापौर असताना महापालिकेच्या नूतन इमारतीसाठी सरकारने मंजुरी दिली होती. मनोहर पर्रीकर केंद्र सरकारमध्ये सहभागी झाले आणि महापालिकेच्या नवीन इमारतीचा प्रकल्प प्रलंबित राहिला, असे माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी सांगितले.