हुर्राकप्रेमींकडून मोठी मागणी : हुर्राकाचा ३५ लिटरचा कॅन सहा हजार रुपयांना

पणजी : राज्यात हुर्राक हंगामाची अधिकृत सुरुवात झाली आहे. भट्ट्या तापू लागल्या असून काजूच्या रसाची पहिली धार हुर्राक म्हणून बाजारात दाखल झाली आहे. सध्या काजू पूर्ण प्रमाणात पिकलेला नसला तरी हंगाम स्थिरावण्यासाठी आणखी १० ते १२ दिवस लागतील, अशी माहिती केपे येथील काजू शेतकरी सत्यवान देसाई यांनी दिली.
हुर्राक तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून राज्यातील काही भागांत भट्ट्या पेटल्या आहेत. काही ठिकाणी मात्र काजूचे पीक पूर्णपणे आले नसल्याने भट्ट्या अजून सुरू झालेल्या नाहीत. तरीही हंगामाची चाहूल लागताच भट्ट्या उभारण्याचे काम सुरू आहे.
सत्यवान देसाई यांनी सांगितले की, हुर्राक निर्मितीला नुकतीच सुरुवात झाली असून हा व्यवसाय पूर्ण गतीने सुरू होण्यासाठी किमान आठ ते दहा दिवस लागतील. सध्या ३५ लिटरच्या एका कॅनची किंमत सुमारे ६ हजार रुपये आहे, तर एक कळस २ हजार ते अडीच हजार रुपयांदराने विकला जात आहे.
केपे, काणकोण आणि पेडणे या तालुक्यांत हुर्राक तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. काजू संकलन, स्वच्छता व डिस्टिलेशन प्रक्रिया सुरू असून काही ठिकाणी भट्ट्या बसवण्याचे कामही वेगात सुरू आहे. पुढील १० ते १२ दिवसांत संपूर्ण राज्यात हुर्राक हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सध्या ग्राहकांकडून हुर्राकाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही देसाई यांनी सांगितले केले.
यंदाचा काजू हंगाम समाधानकारक
गतवर्षीच्या तुलनेत यंदा काजूचे पीक चांगले येण्याची चिन्हे आहेत. हवामान अनुकूल असल्याने मोहोर आणि बीजधारणा प्रक्रिया समाधानकारक झाली आहे. कलम व गावठी काजू दोन्ही प्रकारचे पीक सध्या चांगल्या प्रमाणात लागले असल्याने यंदाचा हंगाम समाधानकारक राहील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.